मुख्यमंत्र्यांनी दिले महापालिकेला 100 कोटी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

नागपूर -  शहरातील विविध विकासकामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला शंभर कोटी रुपये दिलेत. आजवर राज्य शासनातर्फे विशेष अनुदान म्हणून नागपूरला दिलेली ही रक्कम सर्वाधिक आहे. 

नागपूर -  शहरातील विविध विकासकामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला शंभर कोटी रुपये दिलेत. आजवर राज्य शासनातर्फे विशेष अनुदान म्हणून नागपूरला दिलेली ही रक्कम सर्वाधिक आहे. 

सध्या शहरात धडाक्‍यात विकासकामे सुरू आहेत. केंद्रातून नितीन गडकरी आणि राज्यातून देवेंद्र फडणवीस असा दुहेरी निधीचा ओघ शहरात येत आहे. महापालिकेच्या उत्पन्नाच्या मर्यादा लक्षात घेता कोट्यवधींचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे शंभर कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. महापालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वीच ती पूर्ण झाली आहे. या निधीतून प्रत्येक विधानसभा क्षेत्रात सुमारे पंधरा कोटी रुपयांची विकासकामे केली जातील अशी माहिती महापालिकेचे सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी यांनी दिली. 

युतीच्या काळात उपराजधानीचे शहर असल्याने नागपूरला 25 लाखांचे विशेष अनुदान दिल्या जात होते. मात्र, आघाडीच्या कार्यकाळात अनुदान बंद करण्यात आले होते. आता मुख्यमंत्रीच नागपूरचे असल्याने तब्बल शंभर कोटी रुपये मिळाले आहेत. विशेष म्हणजे एकूण 253 कोटी रुपये राज्यातील महापालिकेला देण्यासाठी तरतूद करण्यात आली होती. यातून यापैकी एकट्या नागपूरला महापालिकेला शंभर कोटी रुपये देण्यात आले आहे. 

भट सभागृहाला 20 कोटी 
महापालिकेच्या वतीने दोन हजार आसन क्षमतेचे सुरेश भट सभागृह उभारले जात आहे. सभागृहाची उभारणी जवळपास झाली असून उर्वरित कामांसाठी आणखी निधीची गरज होती. महापालिकेने रस्त्यांचा निधी सभागृहासाठी वळविला होता. याकरिता अर्थसंकल्पात सुधारणा करण्यात आली होती. सोबतच मुख्यमंत्र्यांकडे 30 कोटी रुपयांची मागणी सभागृहासाठी करण्यात आली होती. यापैकी 20 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला देण्यात आला आहे. 15 डिसेंबरला सभागृहाचे उद्‌घाटन व्हावे, असे महापालिकेचे प्रयत्न असल्याचे दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. या वेळी स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊत ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक रमेश सिंगारे उपस्थित होते.

Web Title: 100 crore to the Municipal corporation