गडचिरोलीत १०२ शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांची चाचणी पॉझिटिव्ह, शाळेचा पहिला जाणार कसा?

मिलिंद उमरे
Sunday, 22 November 2020

शाळा सुरू करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी, याच्या मार्गदर्शक सूचना सरकारने निर्गमित केल्या होत्या. त्यानुसार 17 ते 22 नोव्हेंबरपर्यंत शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी शासकीय केंद्रात करण्यात आली.

गडचिरोली : जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना संसर्गाच्या काळात सातत्याने बंद असलेल्या शाळेत  सोमवार (ता. 23)पासून शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यात 3399 जणांची चाचणी पूर्ण झाली असून 102 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाच्या सावटात शाळेचा पहिला दिवस कसा जाणार? असा प्रश्‍न शिक्षक, विद्यार्थी, पालकांसह सर्वांनाच पडला आहे.

हेही वाचा - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जनसंपर्क कक्ष गेला तरी कुठे?

शाळा सुरू करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी, याच्या मार्गदर्शक सूचना सरकारने निर्गमित केल्या होत्या. त्यानुसार 17 ते 22 नोव्हेंबरपर्यंत शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी शासकीय केंद्रात करण्यात आली. शनिवार (ता. 21) सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार, एकूण 3399 मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. यातील 102 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात 7 मुख्याध्यापक, 60 शिक्षक व 35 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. चाचणी केलेल्या शिक्षकाचा अहवाल निगेटिव्ह आला, तरच त्यांना रुजू करून घ्यायचे सरकारचे निर्देश आहेत. त्यामुळे या 102 जणांना शाळेत येता येणार नाही. तरीही या चाचणीतून कुणी सुटले असेल किंवा, कुणाला सौम्य लक्षणे, विषाणूचे प्रमाण  (व्हायरल लोड) कमी असल्याने चाचणी निगेटिव्ह आली असेल, तर धोका होऊ शकतो. 

हेही वाचा - ब्रेकिंग : भूकंपाच्या दुहेरी धक्क्यांनी सिवनी जिल्हा...

शाळेतील सर्व शिक्षकांनी मास्क, हॅण्ड सॅनिटायझर पूर्णवेळ वापरणे आवश्‍यक आहे. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्या विद्यार्थ्याला त्वरित चाचणीसाठी पाठवावे, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी मास्क, हॅण्ड सॅनिटायझर, पिण्याचे पाणी, जेवणाचा डबा स्वतंत्र आणावा, जेवताना योग्य अंतर ठेवावे, कोणत्याही परिस्थितीत चाचणी न झालेले शिक्षक, कर्मचारी विद्यार्थ्यांचा संपर्कात येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. शाळा सुरू झाल्यानंतर दैनिक उपस्थिती शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करावी. प्रत्येक शाळेत दोन पल्स ऑक्‍सिमीटर, 2 थर्मल गन्स आणि सॅनिटायझर उपलब्ध ठेवावे. शाळेतील स्वच्छतागृहाची स्वच्छता रोज करावी, पालकांकडून संमतीपत्र घ्यावे आदी सूचना शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आर. पी. निकम यांनी दिल्या आहेत. याशिवाय विविध ठिकाणी पालकसभा घेऊन पालकांना सर्व सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या निर्णयाला अनेक पालकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे शिक्षणाधिकारी आर. पी. निकम यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - VIRAL AUDIO : प्रचारासाठी उमेदवाराच्या मुलांनी केले...

फक्त दोनच तास -
नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होणार असल्या, तरी त्यांचे वेळापत्रक पूर्वीप्रमाणे नसेल. केवळ दोन तासच शाळा राहणार आहे. दररोज चार तासिका होणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना केवळ गणित, इंग्रजी व विज्ञान हे तीन महत्त्वाचे विषय शिकविण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत फार वेळ बसावे लागणार नाही.

हेही वाचा - हृदयस्पर्शी! मुळ गावी जाण्यासाठी कुटुंबीयांसह निघाला पती; वाटेत पत्नीने सोडली साथ,...

सरकारकडून प्राप्त आदेशानुसार आम्ही सर्व सूचनांचे पालन करत आहोत. शिक्षकांची कोरोना चाचणी, शाळांतील वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण जवळपास होत आले आहे. पालकसभाही घेण्यात येत आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व प्रकारची योग्य काळजी घेऊनच शाळा सुरू होणार आहेत.
- आर. पी. निकम, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), गडचिरोली
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 102 teachers and employee found corona positive in gadchiroli