अकोल्यासाठी मे ठरतोय घातक; कोरोनाच्या एंट्रीनंतर महिनाभरात 129 रुग्ण...वाचा

corona-agencies.jpg
corona-agencies.jpg

अकोला : सात एप्रिल रोजी अकोल्यात पहिला पॉझिटिव रुग्ण आढळला होता मेच्या 8 तारखेला एक महिना उलटून गेला आहे. या एक महिन्यात पॉझिटिव्ह रुग्णांनी शतक पार केले आहे. एप्रिलमध्ये अकोला शहरामध्ये मर्यादित असलेली रुग्ण संख्या मेमध्ये झपाट्याने वाढत आहे. 1 मेपासून पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची संख्या झपाट्याने वाढली असून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 129 रुग्ण पॉझिटिव्ह आढलेले आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाच्या शिरकावाला गुरुवारी, 7 मे रोजी एक महिना पूर्ण झाला आहे. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात तब्बल 105 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, एकूण 10 जणांचा बळी गेला आहेत. तर एकाने आत्महत्या केली आहे. उपचारानंतर पुर्णपणे बरे झालेल्या 14 रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापासून हे संकट आणखीच गडद होत असल्याने येणाऱ्या दिवसांविषयी आणखी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली आहे. 

जिल्ह्यात 7 मार्च रोजी पहिल्या संदिग्ध रुग्णाला तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून कोरोनाविरोधातील लढाई सर्वोपचार रुग्णालयात सुरू झाली. दररोज शेकडो संदिग्ध रुग्णांच्या तपासण्या होत असल्या तरी पुढील एका महिन्याच्या कालावधीत एकही कोरोनाबाधित रुग्ण जिल्ह्यात न आढळल्याने परिस्थिती सुरळीत होती. मात्र 7 एप्रिलला पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला. 

त्यानंतर पुढील चार दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा थेट 13 वर पोहोचल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये 9 एप्रिलला एकाच दिवसात पातूरमधील सात रुग्णांचे रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात होती. त्यानंतर पुढे 27 एप्रिलपर्यंत रुग्ण आढळत गेले तरी परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र 28 तारखेपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेली. त्यात 3 मे रोजी 15 तर 5 मे रोजी एकाच दिवशी तब्बल 11 रुग्ण आढळल्याने बाधितांच्या संख्येत अचानक वाढ होऊन संदिग्ध रुग्णांच्या तपासण्याही वाढल्या आहेत.

आता तरी गंभीरपणे विचार करावा
सध्याची परिस्थिती पाहता दररोज रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी पुढील महिनाभरात अधिक सतर्क राहावे लागणार आहे. बाहेर पडताना सुरक्षात्मक खबरदारी घेणे, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे, गर्दी टाळणे आदी बाबींचे काटेकोर पालन केल्यास वाढता आकडा नियंत्रणात आणता येईल अन्यथा परिस्थिती बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

असे वाढले रुग्ण
7 एप्रिल ः 1
8 एप्रिल ः 1
9 एप्रिल ः 7
10 एप्रिल ः 4
15 एप्रिल ः 1
18 एप्रिल ः 1
19 एप्रिल ः 1
26 एप्रिल ः 1
28 एप्रिल ः 5
29 एप्रिल ः 5
30 एप्रिल ः 1
1 मे ः 4
2 मे ः 8
3 मे ः 15
4 मे ः 9
5 मे ः 11
6 मे ः 7
7 मे ः 13
8 मे ः 34

असा देण्यात आला डिस्चार्ज
23 एप्रिल 7
27 एप्रिल 1
30 एप्रिल 3
3 मे 2
6 मे 1
एकूण 14

असे नोंदविण्यात आले मृत्यू

  • 11 एप्रिल रोजी 30 वर्षीय कोरोना बाधित रुग्णाची आत्महत्या.
  • 13 एप्रिल रोजी उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीचा 15 एप्रिल रोजी पॉझिटिव्ह अहवाल आला.
  • 28 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल झालेल्या एका महिलेचा मृत्यू झाला तिचा अहवाल 29 एप्रिल रोजी पॉझिटिव आला.
  • 28 एप्रिल रोजी रुग्णालयात मृतावस्थेत आणलेल्या एका 56 वर्षीय व्यक्तीचा पॉझिटिव अहवाल 1 मे रोजी आला.
  • 1 मे रोजी दाखल झालेल्या एकूण 80 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला दोन मे रोजी त्याचा पॉझिटिव्ह अहवाल आला.
  • एक व दोन मे रोजी मृत्यू झालेल्या बैद पुरा आणि सिटी कोतवाली परिसरातील दोन महिलांचा तीन मे रोजी पॉझिटिव्ह अहवाल आला.
  • दोन मे रोजी दाखल झालेल्या खनगणपुऱ्यातील 65 वर्षे व्यक्तीचा सहा मे रोजी मृत्यू झाला.
  • सहा मे रोजी बैदपुरा यातील दोन महिला आणि दाणाबाजार येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com