गडचिरोली जिल्ह्यातील 106 बालकांना हृदयरोग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

गडचिरोली : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत आरबीएसके पथकातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हाभरातील अंगणवाड्या व शाळांमध्ये केलेल्या तपासणीदरम्यान 106 बालकांना हृदयरोग असल्याचे निदान झाले आहे. या बालकांची "2 डी. इको' तपासणी केल्यानंतर 47 बालकांवर शासनातर्फे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

गडचिरोली : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत आरबीएसके पथकातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हाभरातील अंगणवाड्या व शाळांमध्ये केलेल्या तपासणीदरम्यान 106 बालकांना हृदयरोग असल्याचे निदान झाले आहे. या बालकांची "2 डी. इको' तपासणी केल्यानंतर 47 बालकांवर शासनातर्फे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात आरबीएसके पथक कार्यरत आहेत. या पथकातील वैद्यकीय अधिकारी सर्व अंगणवाड्या व शाळांमधील शून्य ते 18 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करतात. तपासणीदरम्यान बालकातील गंभीर आजार, हृदयरोग व शस्त्रक्रियेस पात्र बालके शोधून त्यांची शस्त्रक्रिया करून देतात. आतापर्यंत या पथकातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अनेक रुग्ण शोधून काढले. एप्रिल ते आजतागायत करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान 106 बालकांना हृदयरोगाने ग्रासल्याचे आढळून आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात अलीकडेच एक शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 106 बालक रुग्णांची मुंबई येथील बालाजी इस्पितळातील हृदयरोग तज्ज्ञ व त्यांच्या चमूतर्फे 2 डी इकोची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 47 बालकांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. तसेच 59 बालकांना औषधोपचार व नियमित पाठपुरावा करण्याचा सल्ला देण्यात आला. शस्त्रक्रियेस पात्र बालकांवर आरबीएसके वैद्यकीय अधिकारी स्वत: मुंबईला नेऊन शस्त्रक्रिया करून घेणार आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रूडे व सहायक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.माधुरी किलनाके यांच्या मार्गदर्शनाखाली आरबीएसके वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने या हृदयरोगग्रस्त बालकांना आता नवसंजीवनी मिळणार आहे.

आरोग्याची दुरवस्था
जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात आजही दुरवस्था दिसून येते. त्यामुळे दुर्गम, अतिदुर्गम भागांतील गरोदर महिला व बालकांना आरोग्यसेवा मिळणे कठीण होत आहे. लहान विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूसारखी व्यसने वाढली आहेत. त्यामुळे बालकांमध्ये हिरड्यांचे आहार व कर्करोगाचाही प्रादुर्भाव होत आहे. आजची बालके हीच उद्याच्या देशाचे भविष्य असते, असं म्हणतात. म्हणून बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. बाल्यावस्थेतच हृदरोगासारखे आजार होणे, ही अतिशय गंभीर बाब असून आरोग्य यंत्रणेपुढील एक मोठे आव्हानसुद्धा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 106 children suffer heart disease in Gadchiroli district