राज्यात रोपवाटिकांमध्ये 11 कोटी रोपांची निर्मिती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

चार कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट; 15 जून ते 7 जुलैपर्यंत मोहीम राबविणार

चार कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट; 15 जून ते 7 जुलैपर्यंत मोहीम राबविणार
नागपूर - "हरित महाराष्ट्र, सुरक्षित महाराष्ट्र' घडविण्याच्या दृष्टीने यंदा वन विभागाने चार कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. पावसानुसार 15 जून ते 7 जुलै या कालावधीत वनवृत्ताच्या मुख्य वनसंरक्षकांनाच लागवडीसाठी सात दिवसांचा कालावधी निश्‍चित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या कालावधीतच ते पूर्ण करावे लागणार आहे.

महाराष्ट्रातील विविध विभागांत पाऊस पडण्याचा कालावधी निराळा आहे. त्यामुळे एकाच दिवशी वृक्षलागवडीचा संकल्प सोडणे दरवर्षी शक्‍य नसल्याने यंदा हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकांमध्ये विविध प्रजातींच्या रोपांची निर्मिती होत आहे. मध्यवर्ती रोपवाटिकांसह आठशेच्या जवळपास रोपवाटिकांचे अत्याधुनिकीकरण केले आहे. ज्या भागात वाहन जाणे शक्‍य नाही, अशा परिसरात अस्थायी रोपवाटिका केल्या आहेत. त्यात यंदा 11 कोटी रोपांची निर्मिती केलेली आहे.

राज्यातील चार कोटींपैकी एक कोटी ग्रामपंचायती आणि तीन कोटी वृक्ष वन विभाग लावणार आहे. ग्रामपंचायतींना रोपपुरवठा वन विभाग करणार आहे. कृषी व फलोत्पादन, नगर विकास, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा व ग्रामविकास या विभागांमार्फत 41 लाख वृक्षांची लागवड होईल. शिवाय, 2018-19 या वर्षात 13 कोटी, तर 2019-20 मध्ये 33 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एन. एच. काकोडकर यांनी दिली. रोपवाटिकांमध्ये कुठल्या प्रजातींची किती झाडे आहेत, त्यांची लागवड कुठे होणार आहे, ही माहिती ऑनलाइन मिळावी, यासाठी रोपवाटिका व्यवस्थापन माहिती प्रणाली विकसित करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

80 टक्के झाडे जिवंत
राज्यात 1 जुलै 2016 या एकाच दिवशी दोन कोटींपेक्षा अधिक वृक्षलागवड केल्याने त्याची नोंदही "लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'ने घेतली. त्यातील 80 टक्के रोपे जिवंत आहेत. राज्यातील अकरापैकी दहा वनवृत्तांनी वृक्षलागवडीत मोलाचे योगदान दिले असताना पुणे वनवृत्ताची कामगिरी निराशाजनक आहे. वन विभागामार्फत लावलेल्या एक कोटीहून जास्त झाडांपैकी जगलेल्या झाडांची टक्केवारी 80.70 एवढी आहे. मुंबई उपनगर वगळता गडचिरोली येथे रोपे जगण्याची टक्केवारी सर्वाधिक 90 टक्के आहे. पुणे वनवृत्तात केवळ 63 टक्के रोपे मार्चअखेर जिवंत आहेत. उर्वरित संपूर्ण राज्यात 80 ते 90 टक्केवारी राखली गेली. 1 जुलैला लावलेली रोपे लहान असून, त्यांचे संवर्धन पुढील तीन वर्षांत करावे लागेल.

नगरला 14 लाख लागवडीचे उद्दिष्ट
वन विभागाने नगर जिल्ह्यात 14 लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. मागील वर्षी 20 लाख वृक्षलागवड झाली. त्यातील सत्तर टक्के झाडे जगली आहेत. या वर्षीही वृक्षसंवर्धन चांगले होण्यासाठी जिल्हा उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी यांनी नियोजन केले आहे. सरकारचे विविध विभाग, सामाजिक संस्था, मंडळे, देवस्थाने, शाळा, महाविद्यालये इत्यादींच्या माध्यमातून मोहीम राबवली जाणार आहे. नगर व संगमनेर या दोन विभागांतर्गत 40 रोपवाटिकांच्या माध्यमातून 50 लाख रोपांची निर्मिती केली आहे.

पुढील तीन वर्षांत 50 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी रोपवाटिकांचे अत्याधुनिकीकरण केलेले आहे. वनेतर जागेवर अधिकाधिक वृक्षलागवडीसाठी लोकसहभाग घेण्यात येणार आहे. वृक्षलागवडीसाठी जागेचा शोधही सुरू आहे. मागील वर्षी तयार केलेली मोठी रोपे यंदा लावण्यात येणार आहेत.
- सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

पॉईंटर
- चार कोटींपैकी एक कोटी ग्रामपंचायती, तर तीन कोटी रोपे वन विभाग लावणार
- मध्यवर्ती रोपवाटिकेसह जवळजवळ 800 रोपवाटिकांचे आधुनिकीकरण
- 20-18-19 मध्ये 13, तर 2019-20 मध्ये 33 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 carore plant production in nursery