पावसाचा धुमाकूळ; ऑक्‍टोबरमध्ये 11 बळी, घरांचीही पडझड 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

बुलडाणा जिल्ह्यात 17 मोठी व 4 लहान तसेच अमरावती आणि वाशीम जिल्ह्यात प्रत्येकी दोन तर अकोला जिल्ह्यात एका जनावराचा मृत्यू झाला. घरांची पडझड वाशीम जिल्ह्यात अधिक झाली. या जिल्ह्यात 29, बुलडाणा जिल्ह्यात 9 व यवतमाळ जिल्ह्यात एका घराची अंशतः पडझड झाली. 

अमरावती : ऑक्‍टोबरमध्ये अवेळी पावसाने विभागात 1017 गावे बाधित होऊन 11 बळी घेतले, तर लहान-मोठी 26 जनावरे मृत्युमुखी पडली. यात 39 घरांचे अंशतः तर एका घराचे पूर्णतः नुकसान झाले.

Image may contain: 1 person, sitting, standing, outdoor and nature

अवेळी पावसाचा सर्वाधिक फटका अकोला जिल्ह्याला बसला. पूर आणि वीज पडून मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये अकोला जिल्ह्यात शंकर महादेव सोळंके, श्रीकृष्ण गेंदूजी मुस्कुटे, गणेश वामन मोकळकर, लक्ष्मी नागोराव अढाऊ, गजानन गुलाबराव अढाऊ, दादाराव पळसपगार, अमरावती जिल्ह्यात सोनाली गजानन बोबडे, शोभा संजय गाथे, सय्यद नसरुद्दीन, यवतमाळ जिल्ह्यात गजानन बळीराम पिंपळे आणि बुलडाणा जिल्ह्यातील गीता राजेंद्र गोलाईत यांचा मृत्यू झाला. पैकी अकोला जिल्ह्यातील श्रीकृष्ण मुस्कुटे व बुलडाणा जिल्ह्यातील गीता गोलाईत यांचा पुरात वाहून गेल्याने तर उर्वरित मृतांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. या घटना 2 ते 30 ऑक्‍टोबरदरम्यान घडल्या आहेत.

Image may contain: 2 people, people standing, tree, outdoor and nature

बुलडाणा जिल्ह्यात 17 मोठी व 4 लहान तसेच अमरावती आणि वाशीम जिल्ह्यात प्रत्येकी दोन तर अकोला जिल्ह्यात एका जनावराचा मृत्यू झाला. घरांची पडझड वाशीम जिल्ह्यात अधिक झाली. या जिल्ह्यात 29, बुलडाणा जिल्ह्यात 9 व यवतमाळ जिल्ह्यात एका घराची अंशतः पडझड झाली. 

सोयाबीन-कपाशीचे सर्वाधिक नुकसान 
अमरावती विभागात ऑक्‍टोबरच्या मध्यापासून अवेळी पावसाने लावलेल्या हजेरीने खरिपातील तब्बल 12.09 लाख हेक्‍टर क्षेत्रातील पिकांची नासाडी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सुमारे 10.86 लाख शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे. या नुकसानाचे संयुक्त पंचनामे करण्यास यंत्रणेने सुरवात केलेली आहे. 
राज्यभरात अवेळी पावसाच्या हजेरीने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची ओरड होताच मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांवरून महसूल उपसचिवांनी 29 ऑक्‍टोबरला राज्यातील सर्वच विभागीय आयुक्तांना ऑक्‍टोबरमध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानापोटी मदत देण्यासाठी पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.

Image may contain: 10 people, people standing and outdoor

सोबतच यंत्रणांनी प्राथमिक नुकसानाची माहिती घेऊन पंचनामे करण्यास सुरवात केली. त्यानुसार विभागातील 7,259 पैकी 5,528 गावांतील 10 लाख 86 हजार 118 शेतकऱ्यांना अवेळी पावसाचा तडाखा बसला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. खरिपातील कपाशी, ज्वारी, सोयाबीन, तूर, भात, मका, उडीद, मूग, बाजरी, तीळ या पिकांचे नुकसान झाले. विभागात सर्वाधिक 7.23 लाख हेक्‍टर क्षेत्रातील सोयाबीन व त्यापाठोपाठ 3 लाख 82 हजार 947 हेक्‍टर क्षेत्रातील कपाशीचे तसेच त्या खालोखाल 40,572 हेक्‍टर क्षेत्रातील तुरीचे तर 24,665 हेक्‍टरमधील ज्वारीचे नुकसान झाले. मका 16,833, उडीद 10,200 व भात पिकाचे 3,469 हेक्‍टरचे नुकसान झाले आहे. महसूल, कृषी आणि ग्रामीण विकास यंत्रणांच्या संयुक्त सर्वेक्षणातून नुकसानाची वास्तविकता समोर येईल. 

जिल्हानिहाय नुकसान 
जिल्हा : बाधित शेतकरी : बाधित क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) 
अमरावती :1,47,919 : 1,45,053 
अकोला : 2,93,588 : 3,23,535 
बुलडाणा : 4,18,143 : 5,19,196 
यवतमाळ : 1,12,732 : 95,439 
वाशीम : 1,13,736 : 1,25,935 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 death in october. amravati district