गॅस्ट्रोने ११३ बाधित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

दोघांच्या मृत्यूनंतर सावरगावात दहशत - ११ गंभीर काटोलच्या रुग्णालयात
सावरगाव - मंगळवारी दूषित पाण्यातून लागण होऊन वैष्णवी रंजित वंजारी (वय ११) व सतीश नामदेव बागडे (वय २६) या दोघांचा मृत्यू झाला. बुधवारी आणखी ४० रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल झाले. गावातील एकूण बाधितांची संख्या ११३ वर गेली आहे. यापैकी ११ गंभीर रुग्णांना काटोलच्या रुग्णालयात हलविण्यात आले.

दोघांच्या मृत्यूनंतर सावरगावात दहशत - ११ गंभीर काटोलच्या रुग्णालयात
सावरगाव - मंगळवारी दूषित पाण्यातून लागण होऊन वैष्णवी रंजित वंजारी (वय ११) व सतीश नामदेव बागडे (वय २६) या दोघांचा मृत्यू झाला. बुधवारी आणखी ४० रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल झाले. गावातील एकूण बाधितांची संख्या ११३ वर गेली आहे. यापैकी ११ गंभीर रुग्णांना काटोलच्या रुग्णालयात हलविण्यात आले.

बुधवारी गावात आलेल्या आरोग्य विभागाच्या चमूने गावाचे सर्वेक्षण करून घरोघरी औषधाचे वाटप केले. ग्रामस्थांना पाणी स्वच्छतेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. साफसफाईचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. येथे गेल्या काही महिन्यांपासून दूषित पाण्याचा पुरवठा सुरू आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून तपासणी झाल्यानंतर ते पाणी दूषित असल्याचे जाहीर करण्यात आले. वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत कार्यालयाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप संतप्त गावकऱ्यांनी केला. 

शुद्धीकरणापूर्वीच पाणीपुरवठा
सावरगावला गेल्या काही दिवसांपासून चिखली येथील धरणावरून पाणीपुरवठा केला जात होता. परंतु, या पाण्यावर शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया न करताच पाणीपुरवठा केला जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली. गावाला नेहमीच दूषित पाणीपुरवठा होतो. त्यामुळे गॅस्ट्रो, डेंगी, मलेरिया आदी आजारांची दरवर्षी लागण होते. मागील चार-पाच वर्षांपासून गावात पावसाळ्यातच रुग्ण दगावतात. मात्र, यावर्षीचा रुग्णांचा आकडा कितीतरी मोठा आहे. गावाला चिखली मैना पाणी प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो.

तेथील गाळण टाकीतील यंत्र पूर्णपणे निकामी झाले आहे. या यंत्राद्वारे पाणी शुद्ध न होता नागरिकांना प्यावे लागत आहे.

सावरगावला अनिल देशमुखांची भेट
मात्री मंत्री अनिल देशमुख यांनी सावरगाव येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. त्यानंतर डॉक्‍टरांसोबत चर्चा केली. त्यांनी दोन्ही मृत व्यक्तींच्या कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केले. यानंतर ग्रामपंचायतमध्ये झालेल्या बैठकीत अनिल देशमुख यांनी नागरिकांसोबत चर्चा केली. गावात पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी दूषित असल्याने ताबडतोबत पर्यायी व्यवस्था करण्याची सूचनाही त्यांनी केली.

सरपंचांची कानउघाडणी
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबरी बलकवडे यांनी ग्रामपंचायतच्या सरपंचांच्या कारभाराचा आढावा घेतला. हलगर्जीपणा केल्याबद्दल सरपंच उमेश सावंत यांची कानउघाडणी झाली. एवढी मोठी घटना घडल्यानंतर सचिव व सरपंच दोघेही गावात नव्हते. त्याबद्दल ग्रामस्थांनी रोष व्यक्‍त केला. सतीश बागडे यांचा मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठेवून ग्रामपंचायतच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली होती.

पदाधिकाऱ्यांना मेडिक्‍लोरची आठवण
नदीकाठालगत असलेल्या गावांमध्ये पावसाळ्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी उपाध्यक्षांनी मेडिक्‍लोर खरेदीचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, जिल्हा परिषदेतील अंतर्गत कलहामुळे मेडिक्‍लोर खरेदी होऊ शकली नाही. ती झाली असती, तर साथीच्या आजारांना काही प्रमाणात आळा बसला असता.

विहिरीभोवती अस्वच्छता
पदाधिकाऱ्यांनी सरपंचासह स्वच्छता व पाणीपुरवठ्याच्या साधनांना भेट दिली. पाणीपुरवठ्याच्या विहिरीची पाहणी केली. त्यात विहिरीभोवती अस्वच्छता आढळली. जलवाहिनी नाल्यांमधून असल्याची बाब निदर्शनास आली. नाल्यांची सफाई न केल्याने नाल्या तुडुंब भरून पाणी रस्त्यावर वाहत असल्याचे आढळून आले. गावांत खताचे खड्डे, उकिरडे असल्यामुळे डुकरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून आले. त्यामुळे डुकरे गावाबाहेर जंगलात सोडण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले.

Web Title: 113 gastro-affected