नरभक्षक वाघिणीने घेतला गुराख्याच्या नरडीचा घोट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

राळेगाव (जि. यवतमाळ) - वाघिणीने केलेल्या हल्ल्यात गाई चारण्यासाठी जंगलात गेलेला गुराखी ठार झाला. ही घटना शनिवारी (ता. ११) सायंकाळी उघडकीस आली. आठवडाभरात दुसरी घटना घडल्याने जनता भयभीत झाली आहे. वाघू कान्होजी राऊत (वय ६५, रा. विहीरगाव) असे मृताचे नाव आहे.

राळेगाव (जि. यवतमाळ) - वाघिणीने केलेल्या हल्ल्यात गाई चारण्यासाठी जंगलात गेलेला गुराखी ठार झाला. ही घटना शनिवारी (ता. ११) सायंकाळी उघडकीस आली. आठवडाभरात दुसरी घटना घडल्याने जनता भयभीत झाली आहे. वाघू कान्होजी राऊत (वय ६५, रा. विहीरगाव) असे मृताचे नाव आहे.

तालुक्‍यात आतापर्यंत वाघिणीच्या हल्ल्यात १२ नागरिकांचे बळी गेले आहेत. गेल्या शनिवारी (ता. चार) वेडशी येथील गुलाब मोकाशी हा गुराखी वाघाच्या हल्ल्यात ठार झाला होता. मारेगाव वनपरिक्षेत्र व पांढरकवडा वनविभागांतर्गत येणाऱ्या राळेगाव तालुक्‍यातील विहीरगाव जंगलात वाघूजी राऊत, नानाजी नेहारे, मारोती चामलाटे हे तिघेही म्हशी चारण्यासाठी गेले होते. दरम्यान, म्हशी चारून गावाकडे परत येताना शनिवारी सायंकाळी पाच वाजतादरम्यान अचानक नरभक्षक वाघिणीने या तिघांवरही हल्ला केला. या वेळी दोघांनी तिच्या तावडीतून सुटून गावाकडे धाव घेतली.

 मात्र, वाघूजी राऊत यांना वाघिणीने घनदाट जंगलात ओढत नेले. गावकऱ्यांनी जंगलात धाव घेतली. दरम्यान, वाघूजींचा शोध घेतला असता सावरखेडा ते विहीरगाव रस्त्यापासून किमान शंभर मीटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला. मृताच्या मागे पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. 

वनविभागाचे दुर्लक्ष 
बारावा बळी गेला तरी वनविभागाकडून नरभक्षक वाघिणीला पायबंद घालण्यात कठोर पावले उचलली जात नसल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. जंगलात पिंजरे, कॅमेरे, मचाणी लावूनही नरभक्षकांना पकडण्याचे आव्हान वनविभागाला पेलता आले नाही. वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी शुक्रवारी (ता. १०) काँग्रेसने मोर्चा काढला होता.

Web Title: 12 people were victims of attacks