१२ हजार वीज अभियंत्यांची आजपासून सामूहिक रजा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

यवतमाळ - वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून मोहोळ (जि. सोलापूर) येथील उपकार्यकारी अभियंता विकास पानसरे यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या सोलापूर येथील कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंत्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सबऑर्डिनेट इंजिनिअर असोसिएशनने राज्यभर आंदोलनाची मोहीम हाती घेतली आहे. याच आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून उद्या (ता. ६) महावितरण, महापारेषण व महानिर्मितीमधील १२ हजार अभियंते सामूहिक रजेवर जाणार आहेत.

वरिष्ठांच्या दबावामुळे गेल्या काही काळात महावितरण अभियंत्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. सोलापूर येथील उपकार्यकारी अभियंता विकास पानसरे, औरगाबाद येथील अभियंता लांडगे, चार वर्षांपूर्वी नेर येथील अभियंता भीमराव धर्माळे आदींनी प्रशासन व वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. प्रतिकूल परिस्थितीत काम करताना वरिष्ठांची साथ मिळणे आवश्‍यक आहे. मात्र, क्षुल्लक कारणामुळे वरिष्ठ अधिकारी आपल्या अधीनस्त अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव टाकत आहे. या घटनेमुळे अभियंत्यांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यासाठी सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन या अभियंत्यांच्या संघटनेने प्रशासनाला दोन जानेवारीला राज्यव्यापी आंदोलनाची नोटीस दिली आहे. त्यानुसार तीन जानेवारीपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे. काळ्या फिती लावून काम करणे, मंडळ, परिमंडळ व निर्मिती केंद्राबाहेर पदाधिकाऱ्यांचे धरणे आंदोलन केले आहे. 

प्रशासनाच्या जाचाला कंटाळून अभियंत्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी आमचा लढा सुरू आहे. उद्या (ता. ६) तिन्ही कंपन्यांमधील १२ हजार अभियंते सामूहिक रजेवर जाणार आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पाच-सहा महिन्यांत रुजू झालेले अभियंते कर्तव्यावर राहणार आहेत.
- सुनील जगताप, राज्य सरचिटणीस, सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन

Web Title: 12 thousand engineers the power of collective leave day