12 हजार मातांचे बाळंतपण घरीच 

केवल जीवनतारे 
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

नागपूर - प्रगतिशील महाराष्ट्रातील दुर्गम भाग, तांडे, आदिवासी पाडे तसेच झोपडपट्ट्यांमध्ये यावर्षी 12 हजार 820 मातांचे बाळंतपण घरीच झाल्याची सार्वजनिक आरोग्य विभागाची धक्कादायक आकडेवारी आहे. झोपडपट्ट्यांपासून तर दुर्गम भागातील आदिवासी पाड्यांवर दळणवळणाची सोय नसते. यामुळे घरीच प्रसूतीचा पर्याय नाइलाजाने स्वीकारला जातो. 

नागपूर - प्रगतिशील महाराष्ट्रातील दुर्गम भाग, तांडे, आदिवासी पाडे तसेच झोपडपट्ट्यांमध्ये यावर्षी 12 हजार 820 मातांचे बाळंतपण घरीच झाल्याची सार्वजनिक आरोग्य विभागाची धक्कादायक आकडेवारी आहे. झोपडपट्ट्यांपासून तर दुर्गम भागातील आदिवासी पाड्यांवर दळणवळणाची सोय नसते. यामुळे घरीच प्रसूतीचा पर्याय नाइलाजाने स्वीकारला जातो. 

सुरक्षित मातृत्वासाठी राज्य सरकारच्या विविध योजना आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानापासून मातृत्व वंदन योजनांचा जणू पाऊसच सरकारने पाडला आहे. रुग्णालयात होणाऱ्या प्रसूतीच्या प्रमाणात वाढ झाली, तरीही आदिवासीबहुल नंदूरबार, मेळघाट, गडचिरोली, चंद्रपूरसारख्या भागात प्रसूती घरी होत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या नोंदीत आहे. यावर्षी एप्रिल 2017 ते मार्च 2018 या कालावधीत सहा लाख 98 हजार 677 प्रसूती शासकीय रुग्णालयात झाल्या. खासगी रुग्णालयात पाच लाख 51 हजार 777 प्रसूती झाली आहेत. सरकारी व खासगी रुग्णालयात प्रसूती होण्याचे प्रमाण वाढले असले तरी 12 हजार 820 बाळंतपण घरी झाले आहेत. यावरून आदिवासीबहुल भागातील अद्याप सुरक्षित मातृत्वाविषयी सजगता नसल्याचे दिसून येते. 

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरक्षित मातृत्व योजनेअंतर्गत 18 वर्षांनंतर विवाह, 20 व्या वर्षांनंतर बाळंतपणाची जबाबदारी, गरोदर असल्याचे समजल्यानंतर नजीकच्या रुग्णालयात नोंदणी, आशा वर्कर, आरोग्य सेविकांच्या यांच्यामार्फत माहिती देण्यात येते. दायींची विशेष नियुक्ती योजना राबविण्यात येते. त्यानंतरही तांडा, पाडे आणि शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये दळणवळणाच्या साधनांच्या अभावी तसेच हेल्थ पोस्ट घरापासून दूर असल्यामुळे घरी होणाऱ्या प्रसुतीचे प्रमाण कमी होत नसल्याचे दिसून येते. 

1,338 मातांची प्रसूती झोपडीत 
नागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक एक हजार 65 मातांची प्रसूती झोपडीत झाली आहे. त्यापाठोपाठ चंद्रपूरमध्ये 145, गोंदियामध्ये 35, भंडाऱ्यात 38, वर्धा जिल्ह्यात 20 मातांची प्रसूती घरी झाली. यात नागपूर जिल्हाही मागे नाही. गोंदिया जिल्ह्याच्या बरोबरीने 35 मातांची प्रसूती घरी झाली आहे. 

जन्म होताच पहिली काही मिनिटे बाळाच्या आरोग्यासाठी निर्णायक असतात. ग्रामीण व दुर्गम भागात घरी होणाऱ्या प्रसूतीत घट झाली आहे. नागपूर विभागात 87 हजार 915 प्रसूती सरकारी रुग्णालयात तर 24 हजार 849 प्रसूती खासगी रुग्णालयात झाल्या आहेत. या तुलनेत केवळ एक टक्का प्रसूती घरी झाल्या आहेत. 
- डॉ. संजय जयस्वाल, आरोग्य उपसंचालक, नागपूर. 

Web Title: 12 thousand mothers childbirth at home