बापरे! यवतमाळमध्ये आठवड्याभरात १३ जनावरांचा मृत्यू, ५० बाधित

सूरज पाटील
Saturday, 23 January 2021

पशुसंवर्धन विभागाच्या वैद्यकीय अधिकारी पथकाने घटनास्थळावर जाऊन जनावरांवर उपचार सुरू केला आहे. आतापर्यंत जवळपास 50 जनावरांना बाधा झाल्याची माहिती आहे.

यवतमाळ : दारव्हा तालुक्‍यातील हातोला गावात ढोरकाकडा गवत खाल्ल्याने आठवड्याभरात 13 जनावरांचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वैद्यकीय अधिकारी पथकाने घटनास्थळावर जाऊन जनावरांवर उपचार सुरू केला आहे. आतापर्यंत जवळपास 50 जनावरांना बाधा झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा - मुलाला खटकले आईचे प्रेमसंबंध अन् उचलले धक्कादायक पाऊल, आईने काढली समजूत

बर्ड फ्लूची धास्ती जिल्ह्यात पसरली आहे. त्यातच पुन्हा जनावरांचा मृत्यू होत असल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आर्णी तालुक्‍यातील खंडाळा परिसरात आठ मोरांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. शहरापासून काही किलोमीटरवरील सावरगड येथेही पाच हजारांवर कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. बर्ड फ्लूच्या संसर्गाची धास्ती पाहता पशुसंवर्धन विभाग ऍलर्ट मोडवर आहे. अशात दारव्हा तालुक्‍यातील हातोला शेतशिवारात गेल्या आठवड्याभरात तब्बल 13 जनावरांचा संशयास्पद मृत्यू झाला. याची माहिती मिळताच पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या डॉक्‍टरांनी हातोला येथे भेट दिली. प्रकरणाची गांभीर्यता ओळखून पशुचिकित्सालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरच जनावरांचा पंचनामा करून शवविच्छेदन केले. शवविच्छेदनानुसार ढोरकाकडा गवत खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे परिसरातील इतरही जनावरांची तपासणी केली असता, तब्बल 50हून अधिक जनावरांना विषबाधा झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे जनावरांची तपासणी केली जात आहे.

हेही वाचा - 'मेडीकल'समोरील दृश्य पाहून डॉक्टरांचेही पाणावले डोळे, पण बघ्यांच्या भूमिकेशिवाय काहीच...

सध्या शेतकऱ्यांनी गव्हाची लागवड केली आहे. गव्हाच्या बाजूलाच ढोरकाकडा हे गवत उगवले जाते. गवताचे सेवन केल्यामुळे जनावरांना विषबाधा झाली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे. जनावरांची नियमित तपासणी सुरू आहे. जनावरांना काही आजार वाटल्यास पशुपालकांनी त्वरित पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारास आणावे. घाबरण्याचे कारण नाही.
- डॉ. आर. डब्ल्यू. खेरडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, यवतमाळ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 13 animal died in darvha of yavatmal