विदर्भातील 15 डीलरशिपला टाळे

राजेश रामपूरकर
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

नागपूर : सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे विदर्भात कारच्या विक्रीत तब्बल 50 टक्‍क्‍यांनी घट झाली. आजपर्यंत विदर्भातील एकूण 15 डीलरशिप बंद झाल्याने 500 पेक्षा अधिक लोकांचा रोजगार हिरावल्या गेला. वाहन उद्योगासह सुट्या भागांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर संकट ओढावले आहे. येणाऱ्या काळात यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

नागपूर : सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे विदर्भात कारच्या विक्रीत तब्बल 50 टक्‍क्‍यांनी घट झाली. आजपर्यंत विदर्भातील एकूण 15 डीलरशिप बंद झाल्याने 500 पेक्षा अधिक लोकांचा रोजगार हिरावल्या गेला. वाहन उद्योगासह सुट्या भागांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर संकट ओढावले आहे. येणाऱ्या काळात यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.
सध्या वाहनउद्योग मंदीच्या गर्तेत आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत वाहन उत्पादनात तब्बल अकरा टक्‍क्‍यांनी कपात झाली. या क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांचा रोजगार संकटात आला आहे. तीच स्थिती विदर्भातील डीलर्सची आहे. जीएसटीचे चढे दर, वाढता उत्पादन खर्च, वाढलेले विमा दर, लिक्विडिटीचा अभाव आणि वाहनांची घटलेली मागणी ही यामागची कारणे असल्याने डीलर्सही अडचणीत आहेत. त्यामुळे विदर्भातील डीलर्सकडील कामगारांच्या नोकऱ्यांवर संक्रांत आली आहे. वाहनांच्या सुट्या भागांची विक्री करणाऱ्या दुकानदारांना या मंदीची सर्वाधिक झळ बसत आहे. त्यांनीही दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली आहे.
शहरात वाहनांच्या सुट्या भागांची विक्री करणारे 700 ते 800 विक्रेते आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या 10 हजारांपेक्षा अधिक लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत. देशाच्या जीडीपीत या क्षेत्राचा हिस्साही मोठा आहे. गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून या व्यवसायाला सर्वाधिक फटका बसत आहे. गेल्या दिवाळीनंतर वाहनक्षेत्रातील मंदीचा प्रभाव जाणवायला सुरुवात झाल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
केंद्र सरकारनं इलेक्‍ट्रिकल वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण आणि बीएस 6 तंत्रज्ञानही मंदीला कारणीभूत असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यामुळे या क्षेत्रातील लाखो लोक बेरोजगार होण्याच्या मार्गावर आहेत. सरकारने या मंदीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. विदर्भातील अकरा जिल्ह्यांपैकी पाच जिल्ह्यांतील 15 चार चाकी वाहनांचे शोरूममध्ये बंद झालेले आहेत. त्यात नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. सर्वाधिक डीलर्स नागपुरातील आहेत.
वाहनविक्री मंदीच्या गर्तेत अडकली आहे. त्यामुळे 50 टक्के कार व दुचाकीची विक्री घटली. लिक्विडिटीच्या अभावामुळे गणेशोत्सव, दुर्गोत्सव आणि दिवाळीच्या काळातही अशीच वाईट अवस्था राहील.
-निखिल कुसुमगर, कार्यकारी सदस्य, विदर्भ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 dealerships in Vidarbha closed