सहसंचालकांना मागितली 15 लाखांची खंडणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

अमरावती : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय) सहसंचालक माणिक दामोधर वानखडे यांना 15 लाख रुपयांची खंडणी मागण्यासोबतच येथील 12 कर्मचारी व अधिकाऱ्यांकडे पैशांची मागणी केल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी गुरुवारी (ता. 17) येथील कर्मचारी अनिल ठवरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अमरावती : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय) सहसंचालक माणिक दामोधर वानखडे यांना 15 लाख रुपयांची खंडणी मागण्यासोबतच येथील 12 कर्मचारी व अधिकाऱ्यांकडे पैशांची मागणी केल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी गुरुवारी (ता. 17) येथील कर्मचारी अनिल ठवरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अनिल ठवरे याच कार्यालयातील मेटनन्स युनीटमध्ये ऑपरेटर पदावर आहे. ठवरे यांच्या सेवाविषयक कामासंदर्भात संबंधित प्रशासन असमाधानी असल्यामुळे त्यांच्यावर अनेकदा प्रशासकीय कारवाई सुद्धा केली आहे. त्यामुळे ठवरे यांनी त्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने सहसंचालकांसह येथील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या नावाने एक नोटीस बजावली. ही नोटीस सुद्धा त्यांनी स्वत:च तयार केली. त्यामध्ये सहसंचालक वानखडे यांना पंधरा लाख रुपयांची मागणी तर, उर्वरित कर्मचारी, अधिकारी अशा 12 जणांना प्रत्येकी पाच हजार रुपये मागितले होते. त्यासाठी त्याने संबंधितांना फोन सुद्धा केले. पैसे न दिल्यास न्यायालयीन कारवाईची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असल्याचे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले.
व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संस्था, प्रादेशिक कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी ठवरे याच्याकडून सुरू असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळले होते. त्यामुळे सहसंचालक माणिक वानखडे यांनी मंगळवारी (ता. 16) गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी त्याआधारे गुरुवारी (ता. 18) खंडणीचा गुन्हा दाखल केला.
गतवर्षी दिली आत्मदहनाची धमकी
अनिल ठवरे याची मागील वर्षी यवतमाळ येथे बदली झाली होती. त्याविरुद्ध त्याने प्रशासनाला आत्मदहनाची धमकी दिली होती. त्यामुळे 14 ऑगस्ट 2018 रोजी ठवरेला पोलिसांनी अटक केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 lakhs tribute to Joint Director