पंचनाम्याच्या घाईने घात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मे 2019

हुतात्म्यांची नावे  
गडचिरोली - साहुदास मडावी, प्रमोद भोयर, किशोर बोबाटे, योगाजी हलामी, पुरणशहा दुगा, लक्ष्मण कोडापे, गाडीचालक तोमेश्‍वर शिंगनाथ.
भंडारा - दयानंद शहारे, भूपेश वालोदे, नितीन घोडमारे.
यवतमाळ - अग्रमन रहाटे.
नागपूर - अमृत भदाडे.
बुलडाणा - राजू गायकवाड, सर्जेराव खर्डे.
हिंगोली - संतोष चव्हाण.
बीड - आरिफ तौशिब शेख.

गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यातील जांभूळखेडा गावाजवळ बुधवारी सकाळी ११.३०च्या सुमारास नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या शक्तिशाली भूसुरुंग स्फोटात १५ जवान हुतात्मा झाले. तसेच पोलिसांना नेणाऱ्या खासगी वाहनाचा चालकही ठार झाला. तत्पूर्वी नक्षलवाद्यांनी जाळपोळ केलेल्या वाहनांचा पंचनामा करण्यासाठी तेथे जाण्याबाबत उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी घाई केल्यामुळे जवानांना प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कुरखेडा तालुक्‍यातील दादापूर (रामगड) येथे मंगळवारी मध्यरात्री दीडशेच्या संख्येने आलेल्या नक्षलवाद्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील ३६ वाहने, यंत्रसामग्री व कार्यालयाची जाळपोळ केली. या घटनेची माहिती कळाल्यानंतर त्याचा पंचनामा करण्याची घाई करण्यात आली. यासाठी जवानांना एका खासगी वाहनातून जाण्याची परवानगी देण्यात आली.

त्यानुसार जलद प्रतिसाद पथकातील जवान रवाना झाले. कुरखेडा येथून घटनास्थळाकडे जात असताना कुरखेडापासून सहा किलोमीटर अंतरावरील जांभूळखेडा गावाच्या अलीकडे असलेल्या एका छोट्या पुलावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. त्यात वाहनचालक व १५ जवान, अशा १६ जणांचा मृत्यू झाला. भूसुरुंग स्फोट एवढा मोठा होता की, वाहनाच्या चिंधड्या होऊन त्या रस्त्याच्या आजूबाजूला पडल्या. त्यामुळे वाहनातील सर्व जवान व चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तोमेश्‍वर हा रोजंदारी चालक म्हणून दुसऱ्याच्या गाडीवर काम करीत होता. हुतात्मा झालेले सर्व जवान २०१० व २०११ व २०१२ च्या बॅचचे आहेत. 

पोलिस नक्षलवाद्यांत चकमक हल्ल्यानंतर जवानांचे मृतदेह सहा ते सात तास पडून होते. या घटनेची माहिती मिळताच कुरखेडा व पुराडा पोलिस ठाण्यातील पोलिसांची पथके घटनास्थळी पोचली असता तिथे दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. पोलिसांनी नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर दिले. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पळून गेले. पोलिस-नक्षलवाद्यांमध्ये ४५ मिनिटांपर्यंत चकमक चालली.

नक्षलविरोधी अभियान पथक व स्थानिक पोलिसांचे काल दुपारपासून पुराडा गावालगतच्या जंगल परिसरात नक्षलवाद्यांच्या विरोधात कोम्बिंग आँपरेशन सुरू केले. मृतांत सर्वाधिक जवान गडचिरोली जिल्ह्याचे आहेत. सहा पोलिस जवान व वाहनचालक असे सात जण या जिल्ह्यातील आहेत. त्यापाठोपाठ भंडारा जिल्ह्यातील तीन, बुलढाणा जिल्ह्यातील दोन, नागपूर, यवतमाळ, हिंगोली व बीड जिल्ह्यातील प्रत्येकी एका जवानाचा मृतात समावेश आहे.

नियमांचे उल्लंघन केल्याने घात
मोठ्या नक्षलवादी हल्ल्याच्या घटनेच्या ठिकाणी पंचनामा किवा शोधमोहिमेसाठी जाताना जवानांनी खबरदारी बाळगावी, रस्त्यावर सर्चिंग झाल्याशिवाय वाहन वापरू नये, अशा स्पष्ट सूचना आहेत. पण पोलिस अधिकाऱ्यांनी या सूचनांचे पालन न करता जवानांना खासगी वाहनांतून जाण्याची परवानगी दिली आणि हीच चूक जवानांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोटाने उडवून दिलेल्या खासगी वाहनाचा पोलिस अधिकाऱ्यांकडून नियमित वापर केला जात होता. याची पूर्ण कल्पना नक्षलवाद्यांना होती, असेही दिसून येत आहे.

कसनासूर घटनेचा बदला
२४ एप्रिल २०१८ रोजी भामरागड तालुक्‍यातील कसनासूर गावालगत झालेल्या पोलिस-नक्षलवाद्यांच्या चकमकीत नक्षल संघटनेच्या चार दलम कमांडरसह ४० नक्षलवादी ठार झाले होते. या घटनेचा आम्ही बदला घेऊ, असा इशारा नक्षलवाद्यांनी अनेकदा पत्रकांतून दिला होता. त्यानंतर पोलिसांनी सातत्याने राबविलेल्या नक्षलविरोधी अभियानामुळे नक्षलवाद्यांना चाप बसला होता. मात्र काल संधी साधून नक्षलवाद्यांनी मोठा घातपात घडवून आणला.

आमच्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास केला जाईल. 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 soldiers martyred in blast naxal activity gadchiroli