दीडशे कोटींचा बंपर बोनस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

नागपूर - आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागपूर महापालिकेला मुख्यमंत्र्यांनी तब्बल दीडशे कोटींचा बंपर बोनस जाहीर करून सर्वांना दिवाळी भेट दिली. राज्याच्या इतिहासात नागपूरला प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात एकरकमी विशेष अनुदान यापूर्वी कधीच मिळाले नव्हते. यामुळे पालिकेची आर्थिक कोंडीतून सुटका होईल तसेच हजारो कर्मचारी व कंत्राटदारांची दिवाळीही जोरात साजरी होणार आहे.

नागपूर महापालिकेला प्रचंड आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. वेतन आयोगातील  फरक तसेच महागाई भत्त्यांसाठी थकबाकीसाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मुंडण आंदोलन केले होते. शिक्षकांनी तर शिक्षक दिनाच्याच कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. दुसरीकडे देणी थकविल्यामुळे कंत्राटदारांचे रोजच आंदोलन सुरू आहे. राज्यात आणि महापालिकेत भाजपचीच सत्ता असल्याने सत्ताधारी चांगलेच अडचणीत आले होते. यातून सुटका करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली जात होती. या सर्व अडचणी लक्षात घेऊन नगरविकास विभागाने विशेष सहाय अनुदान म्हणून दीडशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसा शासन निर्णयसुद्धा २२ ऑक्‍टोबरला काढण्यात आला आहे.

युतीचा काळात १९९५-९६पासून राज्याची उपराजधानी असल्याने दरवर्षी १५ कोटी रुपयांचे विशेष अनुदान महापालिकेला मंजूर करण्यात आले होते. 
सत्ता पालट झाल्यानंतर अनुदानही बंद झाले होते. त्याच धर्तीवर तब्बल दीडशे कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करून राज्य शासनाने महापालिकेचा अनुशेष दूर केला आहे. उपरोक्त अनुदान नगर विकास विभागाच्या नियतव्यायातून पायाभूस सोयीसुविधांसाठी दिले जाणार आहे. विशेष म्हणजे या अनुदानात महापालिकेला आपला २५ टक्के हिस्सा द्यावा लागणार नाही.

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला. दीडशे कोटींच्या अनुदानाने महापालिकेची आर्थिक कोंडी सुटेल. कर्मचारी तसेच कंत्राटदारांचीही नाराजी दूर होईल. याशिवाय शहराच्या विकासकामांना  गती मिळेल. मुख्यमंत्र्यांचे आभार.
- संदीप जोशी, सत्तापक्षनेते

Web Title: 150 Crore Rupees Bonus to Municipal Employee