150 कुटुंबांची चिखलातून पायपीट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

अमरावती : एकीकडे अमरावतीत कोट्यवधी रुपये खर्चून सिमेंटचे रस्ते बांधण्यात येत आहेत, तर दुसरीकडे राहाटगाव परिसरातील सातबंगला येथील 150 कुटुंबांना अजूनही 1 किलोमीटर पायपीट करून चिखलातून वाट काढावी लागत आहे. विशेष म्हणजे, मागील सहा वर्षांपासून महापालिकेला निवेदन देऊनही काहीच उपाययोजना होत नसल्याने हतबल झालेल्या परिसरातील नागरिकांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन आयटीआय ते सातबंगला मार्गाची ही कहाणी आहे.

पावसाळ्यात तर येथील नागरिकांना द्राविडी प्राणायाम करून मार्ग काढावा लागतो. पावसाच्या पाण्याने रस्ता पूर्ण चिखलमय होत असल्याने एक किलोमीटर लांब गाडी पार्क करून नागरिकांना पायदळ घरापर्यंत जावे लागते. पावसाळ्यात या मार्गावर अधिकच त्रास होत असल्याचे रहिवाशांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. दोन दिवसांपूर्वी आलेल्या दमदार पावसाने पुन्हा या रस्त्याची वाट लागली आहे. यापूर्वी चिखलातून गाडी स्लीप झाल्याने अनेकांना दुखापतही झाली आहे. परंतु मनपाला याचे काहीच सोयरसुतक नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. शासकीय यंत्रणा काहीच करीत नसल्याने कंटाळलेल्या रहिवाशांनी स्वतः एकत्रित येऊन श्रमदानातून हा रस्ता व्यवस्थित केला. मनपाने पावसापूर्वी या रस्त्याचे बांधकाम करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली होती, परंतु हा मुद्दा तसाच पडला आहे. आता देखील रस्ता झाला नाही तर मनपाच्या निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिला.
पर्यायी व्यवस्था
यापूर्वीच्या बजेटमध्ये हा रस्ता टाकला होता. परंतु निधीअभावी काम पेंडिंग पडले. येणाऱ्या बजेटमध्ये कुठल्याही परिस्थितीत या रस्त्याचे बांधकाम केले जाईल. पर्यायी व्यवस्था म्हणून या मार्गावर मुरूम टाकून रस्ता व्यवस्थित केला जाईल, असे नगरसेविका सुरेखा लुंगारे यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 150 families from the mud road