रोबोटिक सर्जरीसाठी मेडिकलला 16 कोटी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जून 2019

नागपूर : गरीब व गरजू रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळण्यासोबतच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अचूक पद्धतीने करण्यासाठी अत्यंत आधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया विभागासाठी मेडिकलला जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीमधून 16 कोटी देण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली.

नागपूर : गरीब व गरजू रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळण्यासोबतच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अचूक पद्धतीने करण्यासाठी अत्यंत आधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया विभागासाठी मेडिकलला जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीमधून 16 कोटी देण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली.
खनिज प्रतिष्ठानच्या निधीमध्ये होणारी सर्व कामे अत्यंत पारदर्शक व्हावीत, यासाठी प्रत्येक कामाचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचे निर्देशही पालकमंत्री यांनी दिले. यावेळी आमदार समीर मेघे, प्रभारी जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, जिल्हा खनिज अधिकारी मिलिंद बऱ्हाणपूरकर तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा खनिज प्रतिष्ठानतर्फे प्राधान्यक्रम असलेल्या योजनांसाठी 138 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी 12 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा निधी विधानसभा मतदारसंघनिहाय समप्रमाणात वितरित करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा तसेच अंगणवाडी व आरोग्य केंद्र सौरऊर्जेवर आणण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यासाठी खनिज प्रतिष्ठानतर्फे निधी उपलब्ध करून देण्यात येत असून यावर्षी 5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासोबतच अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच महिला व बालक आरोग्याच्या सुविधेत वाढ करण्यासाठी डागा रुग्णालयाला 12 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 16 crores for medical hospital