घ्या, सख्ख्या भावांनाच गंडविले; 19.65 लाखांनी फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास आकर्षक परतावा मिळवून देण्याची ग्वाही देत दोन भावांची 19.65 लाखांची फसवणूक करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

नागपूर : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास आकर्षक परतावा मिळवून देण्याची ग्वाही देत दोन भावांची 19.65 लाखांची फसवणूक करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी भूषण मांजरे व अलका मांजरे (रा. जयताळा रोड, खामला) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 
प्राप्त माहितीनुसार, मांजरे शेअर मार्केटशी संबंधित व्यवसायात आहेत. ऐंजल ब्रोकिंग नावाने त्यांचे फर्म आहे. त्या माध्यमातून ते गुंतवणूकदारांना सेवा उपलब्ध करून देतात. मांजरे यांनी एप्रिल 2018 मध्ये तक्रारकर्ते हर्षद श्रीहरी भांडारकर (27, रा. आनंदम सिटी, मॉर्डन मिल रोड) व त्यांचा भाऊ मनीष यांच्यासोबत संपर्क साधला. आरोपी अन्य नातेवाइकांसोबत भांडारकर यांच्याकडे जायचे. त्यांना शेअर मार्केटमध्ये 90 हजार रुपये गुंतवणूक केल्यास 10 टक्के प्रतिमहिना हमखास नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. एप्रिल 2018 ते 9 एप्रिल 2019 दरम्यान वारंवार आरोपींनी भांडारकर बंधूंकडून धनादेश आणि आरटीजीएसद्वारे एकूण 19 लाख 65 हजार रुपये मिळविले. हे पैसे त्यांनी स्वत:साठी वापरले. कोणताही परतावा त्यांनी भांडाकर बंधूंना दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भांडारकर बंधूंनी गणेशपेठ ठाणे गाठून तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करीत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 19.65 lakhs fraud