नाग पकडणारे गारुडी झाले गायब

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

नागपूर ः नागपंचमी दिवशी नागाला दूध पाजण्यासाठी जंगलातून किंवा गारुड्याकडून मंदिराच्या ठिकाणी आणले जात असल्याची प्रथा होती. वन विभागाच्या कारवाईच्या भीतीने असे प्रकार आता राज्यात कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामीण अथवा शहरीभागातही आता गारुडी गायब झालेले आहेत. सर्पमित्रांसाठी प्रकाशित केलेली मानक कार्यप्रणालीची अद्याप अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तेव्हाच उत्साही सर्पमित्रांची स्टंटबाजी थांबेल असेही काही सर्पमित्रांचे म्हणणे आहे.

नागपूर ः नागपंचमी दिवशी नागाला दूध पाजण्यासाठी जंगलातून किंवा गारुड्याकडून मंदिराच्या ठिकाणी आणले जात असल्याची प्रथा होती. वन विभागाच्या कारवाईच्या भीतीने असे प्रकार आता राज्यात कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामीण अथवा शहरीभागातही आता गारुडी गायब झालेले आहेत. सर्पमित्रांसाठी प्रकाशित केलेली मानक कार्यप्रणालीची अद्याप अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तेव्हाच उत्साही सर्पमित्रांची स्टंटबाजी थांबेल असेही काही सर्पमित्रांचे म्हणणे आहे.

नागपंचमीच्या दिवशी नागाला दूध पाजणे शुभ मानले जाते. त्यामुळे कित्येकदा गारुडी नागाला पकडतात आणि त्याच्या शरीरातील विषाची पिशवी व दात तोडतात. त्यामुळे नागाचा अशक्तपणामुळे मृत्यू ओढवतो. वन विभागाची सतर्कता आणि होणाऱ्या कारवाईमुळे हे प्रकार आता कमी झालेले आहेत. वनाधिकारी आणि वन्यजीवप्रेमींच्या प्रबोधनामुळे नागाची ही छळवणूक कमी झालेली आहे. नागपंचमीनिमित्त नागाला जिवंत पकडण्यापेक्षा त्यांच्या मूर्तीची भाविकांनी पूजा करावी. वन विभागाने सर्पमित्रांसाठी मानक कार्यप्रणाली प्रकाशित केलेली आहे. त्याची अंमलबजावणी वन विभागाने अद्याप केलेली नाही. त्याची अंमलबजावणी वन विभागाने केल्यास उत्साही सर्पमित्रांच्या स्टंटबाजीवर निर्बंध येतील. तसेच राज्यात सर्पमित्रांकडून पकडण्यात येत असलेल्या सापांची निर्धारित कालावधीत त्याच्या अधिवासात सोडवणूक केली की नाही याची माहिती मिळेल असे सरपटणाऱ्या प्राण्यांचे अभ्यासक पराग दांडगे यांनी सकाळशी बोलताना दिली.
गेल्या काही वर्षांपासून नागांना पकडण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झालेली आहे. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून नागाची शारीरिक हेळसांड करून दूध पाजण्याच्या घटना कमी झालेल्या आहेत. नागांचे खेळ मुळात कालबाह्य झाल्याने गारुड्यांचे प्रमाण कमी झाले आहे. शिवाय प्रत्येक वर्षी वन विभागाकडून नागपंचमीदिवशी नागांच्या बचावासाठी फिरते पथक नेमले जाते. त्यामुळे गारुड्यांवर चांगलाच वचक आला आहे. गेल्या काही वर्षात अभ्यासक सर्पमित्रांनी अत्यंत जागरूकतेने नागाच्या या त्रासाला कमी केले आहे. पोलिस यंत्रणेलादेखील याबद्दल सतर्क झालेले आहे. मात्र, मांडूळ जातीच्या बिनविषारी सापाची तस्करी दिवसेंदिवस वाढत असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. हा साप गुप्तधनाचा शोध लावतो. या गैरसमजुतीपोटी मांडोळाची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. तस्करी व अवैध व्यापारामुळे ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मांडूळ या सापाला नैसर्गिक अधिवासात मोकळे सोडण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
वन्यजीव अधिनियम कायद्यान्वये साप पकडणे आणि त्याची तस्करी करणे कायद्याने गुन्हा आहे. नागपंचमीला सापाला पकडून त्याचे प्रदर्शन करण्यात येत होते. वन विभागाने सर्पमित्रांच्या मदतीने राज्यात यावर निर्बंध आणण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली. त्यामुळे सापांचे खेळ करण्याचे प्रकार कमी झालेले आहेत.
- नितीन काकोडकर
प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा