21 डबे मागे सोडून संघमित्रा एक्‍स्प्रेस सुसाट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

चंद्रपूर : भरधाव संघमित्रा एक्‍सप्रेसचे कपलिंग अचानक तुटल्याने 24 पैकी 21 डबे 4 ते 5 किलोमीटर मागे धावत राहिले. केवळ तीन डब्यांना घेऊन गाडी पुढे धावत होती. ही घटना शुक्रवारी (ता.26) रात्री आठ वाजताच्या सुमारास वरोरा रेल्वेस्थानकानजीक घडली.

चंद्रपूर : भरधाव संघमित्रा एक्‍सप्रेसचे कपलिंग अचानक तुटल्याने 24 पैकी 21 डबे 4 ते 5 किलोमीटर मागे धावत राहिले. केवळ तीन डब्यांना घेऊन गाडी पुढे धावत होती. ही घटना शुक्रवारी (ता.26) रात्री आठ वाजताच्या सुमारास वरोरा रेल्वेस्थानकानजीक घडली.
पाटणा-बंगळुरू संघमित्रा एक्‍स्प्रेस शुक्रवारी (ता.26) नागपूरवरून सायंकाळी साडेसहा वाजता निघाली. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोराजवळ रात्री आठ वाजताच्या सुमारास पोहोचताच डब्यांना जोडणारे कपलिंग तुटले. त्यामुळे 24 डब्यांच्या या गाडीचे तीन डबेच इंजिनला जोडून होते, तर 21 डबे मागे राहिले. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा 21 डबे वेगळे झाले तेव्हा गाडी ताशी 100 ते 120 किलोमीटर वेगाने धावत होती. वेगळे झाल्यानंतर 21 डबे विनाइंजिन दोन ते तीन किलोमीटर धावत राहिले. यावेळी हे डबे अनियंत्रित होऊन रुळाखाली घसरू शकले असते. मात्र, दैव बलवत्तर म्हणून असे काही झाले नाही. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. इंजिन पाच किलोमीटर पुढे निघून गेल्यावर चालकाला हा प्रकार लक्षात आला. शेवटी रेल्वे अधिकाऱ्यांना हा प्रकार माहीत झाल्यावर त्वरित हालचाली करीत दुसरे इंजिन 21 डब्यांना जोडून गाडी वरोरा स्थानकात आणण्यात आली. तसेच पुढे गेलेले इंजिन वरोरा स्थानकात परत आणून तब्बल 3 तासांनी गाडी बंगळुरूच्या दिशेने रवाना करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 21 coaches of Sanghmitra Express left behind