बापरे... 21 व्या वर्षी मृत्यू; तोही हृदयविकाराने, काय असावी कारणे... 

21-year-old Girl died of heart attack
21-year-old Girl died of heart attack

तिवसा (जि. अमरावती) : मृत्यू हे अटळ सत्य आहे. तो कुणालाही टाळता येत नाही. तो कुठे, कसा आणि केव्हा येईल, हेसुद्धा सांगता येत नाही. परंतु जे आजार पन्नाशीनंतर किंवा म्हातारपणी व्हायचे ते आता 20-21 व्या वर्षी व्हायला लागले आहेत. धक्‍कादायक म्हणजे या आजारांनी दगावणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहेत. या साऱ्यांसाठी बदलती जीवनशैली, बदलत्या खाण्या-पिण्याच्या सवयी, अपुरी झोप अशी कारणे सांगितली जातात. मन सुन्न करणारी अशीच एक घटना तिवसा तालुक्‍यातील ममदापूर येथे उघडकीस आली. ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, सर्वत्र हळहळ व्यक्‍त होत आहे. 

तिवसा तालुक्‍यातील ममदापूर येथे बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास ऍसिडिटी व छातीत दुखत असल्याने 21 वर्षीय तरुणीला तिवसा शहरातील एका खाजगी रुग्णालय दाखल करण्यात आले. ऍसिडिटीमुळे छातीत दुखत असेल असे समजून तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला सुटी देण्यात आली. औषध घेऊन घरी जाताच काही तासातच तिचा त्रास वाढला आणि ती बेशुद्ध पडली. लगेच तिवसा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु रात्री एक वाजताच्या सुमारास डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. 

दीपाली नरेश दाढे (वय 21, रा. ममदापूर) असे मृत तरुणीचे नाव आहे. दीपालीने आयटीआय केले असून, पुण्यातील एका खाजगी कंपनीत ती नोकरी करीत होती. लॉकडाऊनमुळे ती गेल्या तीन महिन्यांपासून गावात राहत होती. काल रात्री घरी असताना अचानक तिला ऍसिडिटी व छातीत प्रचंड वेदना होत असल्याने ती बिछान्यावरून खाली पडली. रात्री साडेदहाच्या सुमारास तिवसा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली. त्यानंतर तिला तिवसा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराला उशीर झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी 11 वाजता ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, निवडक लोकांच्या उपस्थितीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 

सततच्या ऍसिडीटीकडे दुर्लक्ष नको 


दीपालीच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांवर आघात झाला असून, तिला कधीही कोणताही आजार नव्हता. ऍसिडिटी हा सर्वसामान्य आजार मानून, तिने आणि कुटुंबीयांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु सततची ऍसिडीटी, छातीत दुखणे हे सर्वसामान्य आजार नसून, यावर उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. अवेळी खाणे, जंक फूडचे अतिसेवन यामुळे ऍसिडीटी कॉमन आजार मानला जातो. परंतु हाच साधा आजार जीवावर बेतू शकतो, हे दीपालीच्या जाण्याने सिद्ध झाले. 
 

गावात हळहळ 


मनमिळावू आणि सतत हसतमुख असलेल्या दीपालीच्या जाण्याने ममदापूर गावात शोककळा पसरली आहे. दीपालचे वय जाण्याचे होते का, असा एकच प्रश्‍न ग्रामस्थ एकमेकांना विचारत आहेत. दीपालीचे आई-वडील पुरते कोलमडले असून, कुटुंबीय, ग्रामस्थ त्यांना आधार देत आहेत.  

संपादन : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com