चोरट्यांनी नवजीवन एक्स्प्रेस लुटली!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्‍स्प्रेमधील वातानुकूलित बोगीमधील प्रवाशांकडील सोने-चांदीसह इतर मौल्यवान वस्तू कुख्यात चोरांनी चोरून नेल्याची घटना गुरुवारी (ता. 12) रात्रीदरम्यान घडली. याप्रकरणी अकोला जीआरपी पोलिस ठाण्यात 47 हजार 476 रुपयांची तर बडनेरा येथे नऊ लाख 13 हजार 500 रुपयांची चोरी झाल्याची तक्रार दाखल आहे.

अकोल्यात 47 हजार, बडनेरामध्ये नऊ लाखांवर डल्ला
अकोला - चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्‍स्प्रेमधील वातानुकूलित बोगीमधील प्रवाशांकडील सोने-चांदीसह इतर मौल्यवान वस्तू कुख्यात चोरांनी चोरून नेल्याची घटना गुरुवारी (ता. 12) रात्रीदरम्यान घडली. याप्रकरणी अकोला जीआरपी पोलिस ठाण्यात 47 हजार 476 रुपयांची तर बडनेरा येथे नऊ लाख 13 हजार 500 रुपयांची चोरी झाल्याची तक्रार दाखल आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकोला-बडनेराशिवाय इतरही जीआरपी पोलिस ठाण्यात चोरट्यांनी या बोगीतील प्रवाशांकडील तब्बल 30 लाख रुपयांची चोरी केल्याच्या तक्रार दाखल असल्याची माहिती समोर येत आहे.

नवजीवन एक्‍स्प्रेस क्रमांक 12656 चेन्नईहून अहमदाबादकडे जात होती. गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी सकाळीपर्यंत चोरट्यांनी या रेल्वेमधील वातानुकूलित बोगीमधील प्रवाशांकडील पैसे, सोने-चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंची चोरी केली. प्रवाशांनी चाचपणी केली असता अनेकांच्या किंमती वस्तू चोरीला गेल्याचे कळाले. यावरून अनेक प्रवाशांनी आपल्या सोईनुसार विविध जीआरपी पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत.

यातच अकोला जीआरपी पोलिस ठाण्यात सुरत येथील मोनीषा नारायण भंसाली (वय 38) यांनी तक्रार दाखल केली की, ते या एक्‍स्प्रेमधील एसी बोगीच्या बी-4 या कंपार्टमेंटमध्ये होते. हिंगणघाट रेल्वे स्थानकाजवळ येत असताना त्यांच्याकडील एक तपकीरी रंगाची लेडीज बॅग चोरी झाली.

या बॅगमध्ये रोख 25 हजार रुपये, दुचाकीचे लायसन्स, 4.30 ग्रॅम सोने (किंमत 19 हजार 826 रुपये), चांदी 20 ग्रॅम (किंमत 11 हजार 150 रुपये) असा एकूण 47 हजार 476 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या व्यतिरिक्त मालपल्ली येथील रहिवासी चंद्रलेखा नरेंद्र (वय 31) यांनी बडनेरा जीआरपी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली की, त्या एक्‍स्प्रेसमधील बी-5 मध्ये प्रवास करीत होत्या. मध्यरात्री दरम्यान नऊ लाख 13 हजार 500 रुपयांचे सोने, रोख रक्कम असा मुद्देमाल चोरी झाला. हे प्रकरण वर्धा जीआरपी पोलिसांच्या अंतर्गत झाले असल्याने अकोला, बडनेरा जीआरपी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपासासाठी हे प्रकरण वर्धा जीआरपीकडे वर्ग करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा