भाजपचे 22 आमदार कॉंग्रेसच्या संपर्कात : अविनाश पांडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

नागपूर : राजस्थानमधील भाजपचे 22 आमदार कॉंग्रेसच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती कॉंग्रेसचे राष्ट्रीय महासचिव तसेच राजस्थान प्रभारी अविनाश पांडे यांनी दिली. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत राजस्थानमध्ये कॉंग्रेस सत्तेवर येणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

नागपूर : राजस्थानमधील भाजपचे 22 आमदार कॉंग्रेसच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती कॉंग्रेसचे राष्ट्रीय महासचिव तसेच राजस्थान प्रभारी अविनाश पांडे यांनी दिली. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत राजस्थानमध्ये कॉंग्रेस सत्तेवर येणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
अविनाश पांडे यांची नुकतीच कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड झाली आहे. विदर्भातून त्यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक हेसुद्धा आहेत. यानिमित्ताने शनिवारी अविनाश पांडे यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी चर्चा केली. ते म्हणाले की, राजस्थानमध्ये कॉंग्रेसला सत्तेत येण्याची चांगली संधी आहे. सत्ताधारी भाजपच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. येथील जनता राणी सरकारला कंटाळली आहे. त्याचा फायदा कॉंग्रेसला होणारच आहे. त्याशिवाय तेथील तब्बल 22 आमदार कॉंग्रेसच्या संपर्कात आहेत. सध्या सर्व समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला आहे. राजस्थानमध्ये हा प्रयोग केला जाणार आहे का, या प्रश्‍नावर त्यांनी याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे सांगितले.
इतर राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसला भरघोस यश मिळाले आहे. त्यामुळे भाजपविरोधात असंतोष असल्याचे दिसून येते. त्यांना पर्याय म्हणून जनतेला कॉंग्रेस पक्ष जवळचा वाटत आहे. राजस्थानमध्ये 60 दिवसांत 200 पैकी 194 बूथ संमेलन घेण्यात आले. त्या माध्यमातून आठ लाख लोकांशी संपर्क साधण्यात आला.
भाजपमध्ये समन्वय नाही
भाजपला पराभूत करण्यासाठी कॉंग्रेसचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. दुसरीकडे भाजपमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येते. तीन महिने उलटून गेल्यानंतरही भाजपला राजस्थानमध्ये प्रदेशाध्यक्ष देता आला. यावरून भाजपची तेथे काय स्थिती आहे, हे स्पष्ट होते. अशोक गहलोत आणि सचिन पायलट हे दोन नेते समन्वयाने कॉंग्रेसला सत्तेवर घेऊन जातील, अशी आशा अविनाश पांडे यांनी व्यक्त केली.

 

Web Title: 22 bjp mla are in touch