नांद नदीच्या पुरात 22 कर्मचारी अडकले

बेला : नदीला आलेल्या पुरामुळे कंपनीच्या सभोवताल असे पाणी साचले आहे.
बेला : नदीला आलेल्या पुरामुळे कंपनीच्या सभोवताल असे पाणी साचले आहे.

बेला : संततधार पावसामुळे नांद नदीवरील धरणाचे सर्व सातही दरवाजे उघडण्यात आल्याने उमरेड तालुक्‍याच्या दक्षिणेकडील भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून पिपरा येथील एव्हिवेट न्युट्रिशनल सर्व्हिसेस प्रा.लि. या डेअरी कंपनीतील 22 कर्मचारी व 300 जनावरे अडकली आहेत. रविवार रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे उमरेड तालुक्‍यातील सर्व नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नांद धरणाची पातळी वाढल्याने मंगळवारी सकाळी दहा वाजता धरणाचे सर्व दरवाजे उघडण्याचा निर्णय सिंचन विभागाने घेतला. मात्र, याबाबतची माहिती नदीलगतच्या सर्व गावकरी व कंपनीच्या प्रशासनाला केवळ तासभरापूर्वी सकाळी नऊ वाजता देण्यात आली. आधीच पावसामुळे व इतर नदी नाल्याचे पाणी त्यात शिरल्याने पुरामुळे नदी दुथडी भरून वाहत होती. त्यात धरणाचे पाणी सोडल्याने पुराचे पाणी मिळेल त्या दिशेन वाहू लागले. नांद नदीकाठी असलेल्या एव्हिवेट न्युट्रिशनल सर्व्हिसेस कंपनीच्या परिसरात व आसपासच्या शेतातही पाणी शिरले. संपूर्ण परिसर जलमय झाला, रस्ताही दिसत नव्हता. यामुळे कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या शेडमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. पावसाचे पाणी ओसरल्यावर येथून निघता येईल असा विश्‍वास असल्याने कर्मचारी कंपनीच्या बाहेर पडले नाहीत. मात्र, दुपारनंतरही पावसाने खंड न दिल्याने कंपनीत हजर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची चिंता वाढली. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी नऊ वाजतापासून सर्व कर्मचारी वृत्त लिहिस्तोवर अडकलेले होते. सर्व कर्मचारी उपाशी आहेत. गायींना चाराही देणे शक्‍य नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले मागील वर्षीही अशाच प्रकारे धरणाचे पाणी अचानक सोडल्याने कंपनीचे मोठे नुकसान झाले होते. याबाबत सिंचन विभागाने तातडीने कार्यवाही करण्याची सूचना दिली होती. मात्र सिंचन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने असा प्रसंग पुन्हा उद्‌भवला आहे, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत पुराचे पाणी उतरले नसल्याने एनडीआरएफची चमू मदतीसाठी बोलाविण्यात आली आहे. बचावकार्य सुरू आहे.
- शिवाजीराव भांडवलकर, ठाणेदार, बेला
विदर्भातील हा प्लांट अत्याधुनिक आहे. यात 28 कोटींची गुंतवणूक करून सुमारे शंभर लोकांना रोजगार दिला आहे. यावेळी कंपनीत 22 कर्मचारी व दीड ते दोन लाख किमतीच्या 300 गायी अडकल्या आहेत. नुकसान किती झाले हे आताच सांगणे कठीण आहे. मात्र, प्रशासनाकडून मदत मिळत आहे.
- डॉ. प्रदीप प्रभाकर लिंगे, संचालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com