अधिकाऱ्यांच्या नावावर 22 लाखांच्या लाचेची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

नागपूर : भूसंपादनाची रक्कम मिळवून देण्यासाठी परिचयातील व्यक्तीने मदत केली. यानंतर भूसंपादन विभाग, महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे नाव पुढे करीत त्यांना देण्यासाठी तब्बल 22 लाखांच्या लाचेची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी बुटीबोरी येथे सापळा रचून 11.90 लाखांच्या धनादेशासह आरोपीला अटक केली. 

राजू भास्कर पराते (वय 40, रा. नवीन बुटीबोरी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या प्रकरणाची तक्रार करणारी महिला बुटीबोरी तालुक्‍यातील रुईखैरी येथील रहिवासी आहे. गावातून नागपूर-हैदराबाद महामार्ग गेला असून या मार्गात तिच्या वडिलांच्या नावावर असणारे रुईखैरी येथील घर रस्त्याच्या जागेत गेले आहे. शासनाने जागा अधिग्रहित करून तिच्या वडिलांच्या खात्यात एक कोटी रुपये जमा केले. वडिलांनी मोठ्या मुलाच्या पत्नीच्या खात्यात 53 लाख रुपये टाकले आहेत. 
एक कोटीची रक्कम मिळण्यासाठी आरोपी राजू परातेने मदत करीत असल्याचा देखावा केला. अधिकाऱ्यांनीसुद्धा मदत केली असून त्यांना 22 लाख रुपये द्यावे लागणार असल्याचे परातेने सांगितले. वडिलांनी आरोपीला 10 ऑक्‍टोबर रोजी दहा लाख रुपये दिले, त्याने आता उर्वरित रकमेसाठी तगादा लावला होता. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. निरीक्षक संदीप जगताप यांनी तक्रारीची पडताळणी करून सापळ्याची योजना आखली. ठरल्याप्रमाणे एसीबीच्या पथकाने शुक्रवारी महिलेच्या वडिलांना उर्वरित रकमेचा 11.90 लाखांचा धनादेश घेऊन आरोपीकडे पाठविले. धनादेश स्वीकारताच पथकाने त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी बुटीबोरी ठाण्यात गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी पराते हा गावात नेतागिरी करीत असल्याची माहिती आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 22 lakh demand for bribe in the name of officers