संपामुळे 2200 कोटींची उलाढाल ठप्प

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर ः सरकारच्या बॅंका विलीनीकरणाच्या विरोधात बॅंक कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारला होता. सलग तिसऱ्या दिवशी बॅंका बंद असल्याने दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली. बंदमुळे विदर्भातील 2200 कोटींची बॅंकेतील उलाढाल ठप्प झाली.

महाराष्ट्र स्टेट बॅंक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया यांनी केलेल्या आवाहनानुसार एआयबीईए (बेफी) या दोन संघटनांचे साडेसहा हजारांपेक्षा अधिक कर्मचारी देशव्यापी लाक्षणिक संपावर सहभागी झाले होते. त्यामुळे बॅंकांमध्ये शुकशुकाट होता. रविवार सार्वजनिक सुटी, सोमवार मतदान आणि मंगळवारी संप असल्याने, सलग तीन दिवस बॅंका बंद राहिल्यामुळे सर्वसामान्यांना याचा त्रास सहन करावा लागला. संप पुकारलेल्या विदर्भातील शेकडो कर्मचाऱ्यांनी येथील किंग्जवेवरील बॅंक ऑफ इंडियाच्या क्षेत्रिय कार्यालयासमोर इस्टर्न महाराष्ट्र बॅंक एम्प्लॉईज असोसिएशनचे महासचिव जयवंत गुर्वे यांच्या नेतृत्वात निदर्शने केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुरेश बोभाटे, शिक्षक नेते डॉ. युगल रायलू, बेफीचे महासचिव व्ही. व्ही. अस्पानी, अनिल कापडिया, जगदीशन यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना गुर्वे म्हणाले, संप प्रामुख्याने सरकारने जाहीर केलेल्या बॅंका एकत्रीकरणाच्या विरोधात आहे. ज्या प्रक्रियेत सरकार दहा बॅंकांचे एकत्रीकरण करून फक्त चार बॅंका जिवंत ठेवत आहे व सहा बॅंका बंद करत आहेत. सहयोगी बॅंकांचे स्टेट बॅंकेत व देना तसेच विजया बॅंकेचे बडोदा बॅंकेत विलीनीकरण केल्यानंतर या बॅंकांतून सुमारे दोन हजार शाखा बंद करण्यात आल्या आहेत व हेच पुन्हा आज जाहीर केलेल्या विलीनीकरणाबाबतदेखील होणार आहे. सरकारमार्फत एकीकडे सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका बंद करत आहेत. दुसरीकडे खासगी क्षेत्रातून स्मॉल फायनान्स बॅंकांना परवाने दिले जात आहेत. सरकारचे हे धोरण मागील दरवाजाने बॅंक व्यवसायाचे खासगीकरण करण्याचे असल्याचा आरोप केला. आभार सत्यप्रकाश तिवारी यांनी मानले. निदर्शने यशस्वी करण्यासाठी मिलिंद वासनिक, चोडिल अय्यर, अंजली राणा, एल. पी. नंदनवार, प्रभात कोकास, प्रदीप गौर यांनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com