देशातील 227 युवक  करणार "निर्माण दशकपूर्ती'; "सर्च'चा उपक्रम 

nirman sarch
nirman sarch

गडचिरोली : सर्च संस्थेचे संस्थापक व संचालक पद्मश्री डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांनी 2006 पासून युवा निर्मितीसाठी सुरू केलेल्या "निर्माण' उपक्रमाच्या दहाव्या सत्रास लवकरच सुरुवात होत आहे. यासाठीची निवड प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून, देशभरातील 227 युवांची शिबिरांसाठी निवड झाली आहे. यामध्ये 122 युवती आणि 105 युवकांचा सहभाग आहे. तब्बल 1 हजार अर्जांमधून ही निवड करण्यात आली आहे. 

आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी व्हावा, अशी इच्छा असणाऱ्या युवांना ओळखून त्यांना संघटित व मार्गदर्शन करण्यासाठी निर्माण ही शैक्षणिक प्रक्रिया सुरू करण्यात आली. युवांना त्यांची कौशल्ये व सामाजिक आव्हानांची सांगड घालून समृद्ध व समाधानी जीवन जगण्यास प्रवृत्त करणे हे निर्माण प्रक्रियेचे ध्येय आहे. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून शिबिरांची एक मालिका विकसित करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील "सर्च' येथे होणाऱ्या या शिबिरांदरम्यान स्वतःची ओळख, माझ्या आजूबाजूच्या समाजाची व निसर्गाची ओळख, समाजातील विविध प्रश्‍न व त्या सोडविण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, प्रत्यक्ष सामाजिक काम करणाऱ्या वेगवेगळ्या लोकांसोबत चर्चा, अशा टप्प्यांमधून जाताना "मी जीवनात काय करू' या निर्णयापर्यंत शिबिरार्थी येतात. 2018-19 पर्यंत निर्माणच्या 9 बॅचेस पार पडल्या.

महाराष्ट्रासह देशभरात विविध शैक्षणिक पार्श्‍वभूमीचे 1200 निर्माणी पसरलेले आहेत. त्यांच्यापैकी सुमारे 350 जण कुठल्या ना कुठला सामाजिक प्रश्‍नावर काम करीत आहेत. या सत्रासाठीच्या निवड प्रक्रियेत तब्बल 1 हजार अर्ज निर्माणकडे आले होते. विविध पातळ्यांवर घेतलेल्या मुलाखतींमधून निर्माणच्या दहाव्या सत्रासाठी 227 युवांची निवड करण्यात आले आहे. यामध्ये मराठवाड्यातील 29, उत्तर महाराष्ट्रातील 30, पश्‍चिम महाराष्ट्रातील 28, पूर्व विदर्भातील 32, पश्‍चिम विदर्भातील 30, मुंबईतील 25, पुण्यातील 15, कोकणातील 1 याचबरोबर केरळ, कर्नाटक, गोवा, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाना, नवी दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्‍चिम बंगाल या राज्यांतील 37 युवक-युवती या सत्रासाठी निवडण्यात आले आहेत.

भारतातील नामांकित अशा एआयआयएमएस दिल्ली, रायपूर, ऋषिकेश, तसेच महाराष्ट्रातील 20 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आयआयटी मुंबई, बनारस, इंदूर, दिल्ली, आयआयएसईआर पुणे, भोपाळ, तिरुपती या संस्थांसह राज्य व देशभरातील विविध नामांकित संस्थांमधील आरोग्य, अभियांत्रिकी, वकिली, समाजकार्य, पत्रकारिता, कला, वाणिज्य, विज्ञान, सांख्यिकी, सिनेमा, नाट्य या क्षेत्रांतील युवांचा यात समावेश आहे. निवड झालेल्या 227 युवांना तीन शिबिरांत विभागण्यात आले आहे. या सत्रातील पहिले शिबिर 27 डिसेंबर 2019 ते 4 जानेवारी 2020 दरम्यान, दुसरे शिबिर 8 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत तर तिसरे शिबिर 29 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत होत आहे. 

निर्माणच्या संकेतस्थळावर ही संपूर्ण यादी प्रकाशित करण्यात आली आहे. सोबतच आवश्‍यक त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या सत्राच्या निमित्ताने निर्माण हा उपक्रम दहाव्या वर्षात प्रवेश करीत असल्याने याचे विशेष औचित्य आहे. 

प्रथमच "निर्माण एक्‍स' प्रयोग 
निर्माण शिक्षण प्रक्रिया प्रत्येकाच्या वैयक्तिक विकासावर लक्ष ठेवते. प्रत्येकाची काम करण्याची आवड, पद्धती आणि कल वेगळा असतो. निर्माण निवड प्रक्रियेदरम्यान ही बाब नेहमीच प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे असा वेगळा कल असलेल्या युवांना लक्षात घेत त्यांच्यासाठी "निर्माण एक्‍स' नावाने वेगळा कृती कार्यक्रम तयार करण्याचा प्रयोग प्रथमच निर्माण दशकपूर्तीच्या निमित्ताने केला जाणार आहे. यासाठी 97 युवक-युवती निवडले गेले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com