बनावट धनादेशाद्वारे काढले 23.70 लाख

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मे 2019

नागपूर : बनावट धनादेशाचा उपयोग करीत पंजाब नॅशनल बॅंकेच्या खात्यातून 23.70 लाख रुपये वळते करीत अपहार करण्यात आल्याचे प्रकरण पुढे आले आहे. पंजाब नॅशनल बॅंकेच्या मानकापूर शाखेतील अधिकारी शीतल खुळसाम यांनी या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे.

नागपूर : बनावट धनादेशाचा उपयोग करीत पंजाब नॅशनल बॅंकेच्या खात्यातून 23.70 लाख रुपये वळते करीत अपहार करण्यात आल्याचे प्रकरण पुढे आले आहे. पंजाब नॅशनल बॅंकेच्या मानकापूर शाखेतील अधिकारी शीतल खुळसाम यांनी या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे.
या प्रकरणातील तक्रारीनुसार मुख्य आरोपी सागर कोहळे याचे मानकापूर शाखेत खाते आहे. 12 एप्रिल रोजी कोहळेने 23.70 लाखांचा धनादेश बॅंकेत जमा केला. हा धनादेश बिहारच्या संजयकुमार सिंग यांनी दिला असल्याचे त्याने भासविले. रक्कम अधिक असल्याने बॅंकेकडून कोहळे आणि संजय कुमार सिंग यांच्याशी संपर्क साधण्यात आला. दोघांच्याही मान्यतेनंतर रक्कम कोहळेच्या खात्यात वळती करण्यात आली. पण, 25 एप्रिल रोजी बिहार येथील शाखेकडून मानकापूर शाखेला ई-मेल आला. त्यात संजयकुमार सिंग यांच्या खात्यातून खोट्या चेकद्वारे व्यवहार करण्यात आल्याचे आणि संबंधित क्रमांकाचा चेक त्यांच्याकडे असल्याचा दावा करण्यात आला होता. यामुळे मानकापूर शाखेकडून स्थानिक स्तरावर तपासणी केली असता कोहळे याने सादर केलेला धनादेश बनावट असला तरी संजयकुमारकडे असलेल्या चेकबुकशी संबंधित संपूर्ण माहिती त्यावर अंकित असल्याची आणि संजयकुमारची बनावट स्वाक्षरी केली असल्याची बाब पुढे आली. व्यवसायाच्या निमित्ताने कोहळे आणि संजयकुमारचा संपर्क आला असावा, त्याचवेळी कोहळेने ओरीजनल धनादेशावरील संपूर्ण माहिती आपल्याकडे ठेवून घेत बनावट धनादेश तयार केला असावा, असा कयास लावला जात आहे.
तिकडे धनादेश वठताच कोहळेने तातडीने सहआरोपी स्वप्निल सुभाष, श्‍वेता हजारे, बरबटे ऍटोमोटिव्ह प्रा. लि., नितीन निखाडे, ज्योतीराम देव व इतरांच्या खात्यात ही रक्कम वळती केली. हा संपूर्ण घोळ उघडकीस येण्यापूर्वीच रकमेची विल्हेवाट लावून आरोपी मोकळे झाले होते. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू केला आहे. सागर कोहोळेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असल्याचीही माहिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 23.70 lakh drawn by fake check