25 टक्के प्रकरणे सुटली सामंजस्यातून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

नागपूर - राष्ट्रीय लोक न्यायालयात राज्यातील 2 लाख 92 हजार 322 प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले. यातील 25 टक्के प्रकरणे सामंजस्यातून सुटल्याने व्यवस्थेवरचा मोठा भार हलका झाला. विशेष म्हणजे यात एक हजाराहून अधिक प्रकरणांचा निकाल लावण्यात नागपूरचा मोठा वाटा आहे. 

नागपूर - राष्ट्रीय लोक न्यायालयात राज्यातील 2 लाख 92 हजार 322 प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले. यातील 25 टक्के प्रकरणे सामंजस्यातून सुटल्याने व्यवस्थेवरचा मोठा भार हलका झाला. विशेष म्हणजे यात एक हजाराहून अधिक प्रकरणांचा निकाल लावण्यात नागपूरचा मोठा वाटा आहे. 

यासंदर्भातील आकडेवारी अलीकडेच जाहीर करण्यात आली. राज्यभरात आयोजित लोक न्यायालयांमध्ये एकूण 10 लाख 11 हजार 299 प्रकरणे न्यायनिवाड्यासाठी ठेवण्यात आली. त्यापैकी न्यायालयात प्रलंबित असलेली 2 लाख 46 हजार 368 व न्यायालयात दाखल होण्यापूर्वीची 44 हजार 954 प्रकरणे समुपदेशन व पक्षकारांचे सामंजस्य यातून निकाली निघाली. सातारा जिल्ह्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी करून सर्वाधिक 81 हजार 315 प्रकरणे कायमची संपवली. न्यायालयात दाखल झालेली व दाखल होण्यासाठी आलेली अनेक प्रकरणे किरकोळ स्वरूपाची असतात किंवा बऱ्याच प्रकरणांमध्ये वादग्रस्त मुद्यांमुळे तातडीने निकाल देणे शक्‍य होत नाही. अशा परिस्थितीत पक्षकारांमध्ये सहमतीने तडजोड झाल्यास प्रकरणे लवकर निकाली निघू शकतात. त्यामुळे पक्षकारांचा वेळ, पैसा व मनस्ताप वाचतो. ही बाब लक्षात घेता देशभरात वेळोवेळी लोक न्यायालये आयोजित करून त्यात तडजोडीयोग्य प्रकरणे निकालाकरिता ठेवली जातात. 

प्रकरणे निकाली... 
नागपूर 9963, धुळे 8096, भंडारा 7319, मुंबई 7312, यवतमाळ 2622, ठाणे 1817, अहमदनगर 1284, औरंगाबाद 1160, सोलापूर 1141 आणि बीड 1011 

विक्रमी तडजोड 
अपघात दावे, विमा दावे, धनादेश अनादर इत्यादी आर्थिक प्रकरणांमध्ये एकूण 558 कोटी 4 लाख 44 हजार 417 रुपयांची तडजोड झाली. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक 52 कोटी 14 लाख 21 हजार 776 रुपयांची प्रकरणे निकाली निघाली.

Web Title: 25% of cases have been solved