काझीपेठवरून गोंदियाला पायदळ निघालं बिऱ्हाड; गोंडपिपरीत भरविला त्यांना प्रेमाचा घास 

Labours
Labours

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : कोरोनाच्या संकटकाळात मजूर, कष्टकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. लॉकडाउनपासून काम थांबलं. आधारकार्ड दाखवून कुणी अन्नधान्य द्यायला तयार नाही. अशा संकटाला कंटाळून तेलंगणातील काझीपेठ येथून 13 एप्रिल रोजी मजुरांचं बिऱ्हाड निघालं. त्यांना गोंदियाला स्वगृही परतायच होतं. सात दिवसांचा पायदळ प्रवास करून शनिवारी ही मंडळी गोंडपिपरीत आली. मध्यरात्री मुसळधार पावसाला सुरवात झाली. अन्‌ उपाशीपोटीच भोंग्याचा आधार घेत त्यांनी रात्र काढली. पहाटेच पुढच्या प्रवासाला निघाले. उपासाने पोट खाली गेले. वढोलीच्या अंधारी नदीपर्यंत गेले. चालणं अशक्‍य झाल्याने ते तिथेच थांबले. अशावेळी वढोलीतील किराणा दुकानचालक असलेल्या एका युवा कार्यकर्त्याला कष्टकऱ्यांच्या वेदना पहावल्या नाही. त्याने संपूर्ण बिऱ्हाडाची जेवणाची, आरामाची व्यवस्था केली. एवढेच नाही तर चाळीस किलोमीटरवर गेल्यानंतर त्यांच्या व्यवस्थेचे नियोजन करीत माणुसकीचा ओलावा जिवंत असल्याचा प्रत्यय दिला. 

पोटासाठी गोंदिया जिल्ह्यातील सोनदळ, शेंडा येथील जवळपास 25 मजूर तेलंगणातील काझीपेठ परिसरात गेले होते. तीन महिने काम करून पैसे कमवायचे. मग त्याच भरवशावर संपूर्ण वर्ष काढायचे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मंडळी याच पद्धतीने काम करीत आहे. पण यंदा कोरोनाचं संकट आलं अन्‌ होत्याचं नव्हतं झालं. लॉकडाउनमध्ये सारचं काम थांबलं. जमा झालेले पैसे खर्च होण्यावर आले. 
अशात आधारकार्ड दाखवूनदेखील अन्नधान्याची सुविधा होत नसल्याने मजुरांनी गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला. सर्व पायदळ निघाले. 13 एप्रिल रोजी काझीपेठवरून निघाले. मुख्य मार्गाने जाताना पोलिस अडवतील याची भीती त्यांना होती. यामुळे शेतातून वाट काढत ते निघाले. सात दिवसांच्या पायी प्रवासानंतर ते रात्री गोंडपिपरीत पोहोचले. रात्र झाल्याने बिऱ्हाड रस्त्यावर थांबले. मध्यरात्री पावसाने झोडपले. रात्र उपाशी काढली. दुसऱ्या दिवशी त्यांचा पुढचा प्रवास सुरू झाला.

किराणा दुकानदार सूरज माडूरवार मदतीसाठी धावले

वढोलीच्या अंधारी नदीपर्यंत गेले. पण चालणं शक्‍य नव्हते. यामुळे नदीच्या तीरावर ते थांबले. वढोली येथील किराणा दुकानदार सूरज माडूरवार यांना ही माहिती मिळाली. त्यांनी या मजुरांची भेट घेतली. त्यांचा वेदनादायी प्रवास ऐकून माडुरवारांनी त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. नदीलगतच असलेल्या राइस मिल येथे या बिऱ्हाडासाठी सूरज माडूरवार यांनी जेवणाची व्यवस्था केली. गावातील मोहन चुदरी, साई कोहपरे, सुरेश रणदिवे, सूरज भोयर, नबात सोनटक्‍के, गुरुदास अलोने, गोकुळ सोनटक्‍के, राकेश बुटले, अमित भोयर हे कार्यकर्ते सोबतीला आले. बिऱ्हाडातील 25 सदस्यांनी मनसोक्त जेवण केले. पोटभर जेवण झाल्यानंतर ही मंडळी पुढच्या प्रवासाला निघाली. यावेळी पुढच्या 40 किलोमीटर अंतरावर त्यांच्या खाण्यापिण्याचे नियोजन सूरज माडूरवार यांनी केले. 

काझीपेठ येथून पायदळ निघालेल्या 25 सदस्यांच्या वेदना बघितल्या. अशा संकटकाळात आम्ही यांच्या जेवणाची व्यवस्था केली. पुढेही त्यांना गोंदियापर्यंत पायदळच जायचे आहे. अशाकाळी संवेदनशील लोकांनी त्यांना मदत करावी. 
सूरज माडुरवार, युवा कार्यकर्ता, वढोली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com