25 रुपयांची झेरॉक्‍स चारशे रुपयांत!

file photo
file photo

नागपूर : बोर्डाच्या निकालात यावर्षी कमालीची घट झाल्याने उत्तरपत्रिकांची झेरॉक्‍स प्रत मागणाऱ्यांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. 20 पानांच्या झेरॉक्‍ससाठी तब्बल चारशे रुपये शुल्क आकारले जात आहे. त्यातून बोर्डाची जोरदार कमाई सुरू आहे. एकट्या नागपूर विभागातून पाच हजारांवर बारावीच्या विद्यार्थ्यांनी झेरॉक्‍स प्रतींची मागणी केली. त्यातून बोर्डाला आतापर्यंत 20 लाखांहून अधिकचा नफा झाला असला तरी 25 रुपयांच्या कामासाठी चारशे रुपये आकारणे ही विद्यार्थ्यांची लूट आहे.
दोन वर्षांपूर्वी 50 रुपयांत गुणपडताळणी व्हायची. त्यातून विद्यार्थी-पालक समाधानी नसल्याने उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्‍सची मागणी करण्यात येत होती. हे प्रकरण उच्च न्यायालयातही गेले. मागणीनुसार परवडणाऱ्या दरात झेरॉक्‍सप्रती उपलब्ध करून देण्याचे निर्देश न्यायालयाने बोर्डाला दिले. यानंतरही बोर्डाने एका उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्‍ससाठी चारशे रुपये तर त्यावरील फेरमूल्यांकनासाठी तीनशे रुपये असे एकूण 700 रुपये आकारण्यास सुरुवात केली.
यावर्षी बारावीच्या परीक्षेत राज्यात 3 लाख 777 विद्यार्थी तर दहावीच्या निकालात जवळपास 3 लाख 70 हजारांवर विद्यार्थी नापास झाले.
विभागीय मंडळात ही संख्या अनुक्रमे 16 हजार 704 आणि 53 हजार 28 आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना सोमवार तर दहावीसाठी 29 तारखेपर्यंत झेरॉक्‍ससाठी अर्ज दाखल करता येणार आहे. आतापर्यंत बोर्डांकडे बारावीच्या पाच हजारांवर तर दहावीच्या हजारावर विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. शेवटल्या तारखेपर्यंत दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या आठ ते नऊ हजारांवर जाण्याची शक्‍यता आहे.
राज्यातील 30 टक्के विद्यार्थ्यांनीही अर्ज केल्यास त्यापोटी मिळणारी रक्कम कोट्यवधींच्या घरात राहणार आहे. याउलट झेरॉक्‍सचा खर्च अत्यल्प आहे. दरम्यान, यासंदर्भात बोर्डाचे अध्यक्ष रविकांत देशपांडे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी राज्य मंडळाचा निर्णय असल्याने, त्याची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com