esakal | शरीरसुखासाठी तीन तरुणींसह 25 हजारांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

शरीरसुखासाठी तीन तरुणींसह 25 हजारांची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर, ता. 3 ः पोलिसांनी एमपीडीएअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. ही कारवाई न करण्यासाठी तीन तरुणींसह 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यासह पोलिस हेडकॉन्स्टेबलला मंगळवारी (ता. 3) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. सामाजिक सुरक्षा विभागात सहायक पोलिस उपनिरीक्षक आणि पोलिस हेडकॉन्स्टेबल असून एएसआय दामोदर संपतराव राजूरकर (वय 56) आणि हेडकॉन्स्टेबल शीतलाप्रसाद रामलखन मिश्रा अशी पोलिसांची नावे आहेत. खाकी वर्दीतील प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रकार उपराजधानीत घडल्यानंतर सामाजिक सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह उभे ठाकले आहे.
उपराजधानीतील 32 वर्षीय तक्रारदार तरुणीच्या "स्पॉ'मध्ये तीन वेळा छापा टाकून सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने देहविक्रीचा व्यवसाय उघडकीस आणला होता. मात्र, येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तिला आयटी पार्कजवळील भरोसा सेलमधील एसएसबीच्या कार्यालयात बोलाविले. तिच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई केली. एमपीडीएअंतर्गत कारवाई न करण्यासाठी राजूरकर व मिश्रा या दोघांनी तिला 25 हजार रुपये मागितले. याशिवाय शरीरसुखासाठी तीन तरुणी पुरविण्यात याव्यात, अशीही मागणी केली. यामुळे तरुणीने एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या अधीक्षक रश्‍मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार, माहुलकर यांनी सापळा रचून उपअधीक्षक महेश चाटे, निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही मोहीम फत्ते केली.

अशी झाली कारवाई
मंगळवारी दुपारी ही तरुणी एसएसबी कार्यालयात गेली. यावेळी राजूरकर आणि मिश्रा या दोघांनी 25 हजार रुपये व तीन तरुणी पुरविण्यात याव्यात, अशी मागणी केल्याचे संभाषण रेकॉर्ड केले गेले. मात्र, यावेळी दोघांच्याही मनात संशयाची पाल चुकचुकली. त्यांनी तरुणीची झडती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणीने तेथून पळ काढला. आणि बाहेर दबा धरून असलेल्या पंचांना "रेकॉर्डर' दिले. लाच मागितल्याचे स्पष्ट होताच एसीबीच्या पथकाने दोघांनाही अटक केली. प्रतापनगर पोलिस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

loading image
go to top