27 गावांचा संपर्क तुटला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

अमरावती ः जिल्ह्यात गुरुवारी (ता.आठ) पहाटे दीड वाजतापासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नदी-नाले वाहू लागले आहेत. धारणी तालुक्‍यात अतिवृष्टी होऊन बैरागड परिसरातील 27 गावांचा संपर्क तुटला. ग्रामीण भागात दोन घरांचे अंशतः नुकसान तसेच नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यात घराची भिंत कोसळल्याने एक मुलगी जखमी झाली आहे.

अमरावती ः जिल्ह्यात गुरुवारी (ता.आठ) पहाटे दीड वाजतापासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नदी-नाले वाहू लागले आहेत. धारणी तालुक्‍यात अतिवृष्टी होऊन बैरागड परिसरातील 27 गावांचा संपर्क तुटला. ग्रामीण भागात दोन घरांचे अंशतः नुकसान तसेच नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यात घराची भिंत कोसळल्याने एक मुलगी जखमी झाली आहे.
जिल्ह्यात दहा ते बारा दिवसांपासून ढगाळी वातावरण असून श्रावणातील सरी कोसळत आहेत. ऊर्ध्व वर्धा तसेच लघु प्रकल्पांना पावसाची प्रतीक्षा असतानाच बुधवारी (ता. सात) रात्री दीड वाजतापासून संततधार पाऊस बरसण्यास सुरुवात झालेली आहे. दर्यापूर तालुका तसेच मेळघाटात पावसाचा जोर अधिक आहे. बैरागड येथे पुलावरून पाणी वाहू लागल्याने धारणीला जोडणाऱ्या तालुक्‍यातील 27 गावांचा संपर्क तुटला आहे. धारणी तालुक्‍यात पूरपरिस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाने कूच केली, मात्र स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिल्यावरून बचाव व शोध पथक अचलपूर तालुक्‍यातून मुख्यालयी परतले. या पावसामुळे नदी, नाले वाहू लागले आहेत. तलावांमध्ये येव्याचे प्रमाण वाढलेले आहे. दर्यापूर तालुक्‍यात दोन तर वरुड तालुक्‍यात एका घराचे अंशतः नुकसान झाले. नांदगावखंडेश्‍वर येथे सकाळी 8 वाजता अनिल जानराव डाखोरे यांच्या घराची विटामातीची भिंत कोसळली. त्यात राधिका अनिल डाखोरे ही मुलगी जखमी झाली. उपचार करून तिला घरी परत पाठविण्यात आले.

सपनची चार दारे उघडली
सपन प्रकल्पात पाण्याचा येवा वाढल्याने या धरणाची चार दारे 8 सेंटीमीटर उघडण्यात आली. त्यातून 22.82 घनमीटर प्रति सेकंद विसर्ग होत आहे.

जलसाठ्याची स्थिती
ऊर्ध्व वर्धा ः 27.42 टक्के
शहानूर, चंद्रभागा, पूर्णा आणि सपन मध्यम प्रकल्प ः 76.75 टक्के, 80 लघु प्रकल्प ः 27.34 टक्के.

पर्जन्यमान
जिल्ह्यात गुरुवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या चोवीस तासांमध्ये 32 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद घेण्यात आली. धारणी तालुक्‍यात सर्वाधिक 125.1 मिलीमीटर, तर सर्वात कमी तिवसा तालुक्‍यात 7.1 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद घेण्यात आली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 27 गावांचा संपर्क तुटला