अबब...270 जणांना मुख कर्करोग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

-अकोला, यवतमाळमध्ये उपचार
-मुख स्वास्थ तपासणीतून मिळाली माहिती
-पुर्वावस्थेत लक्षण ओळखणे गरजेचे

अकोला ः मुख कर्करोगाचे प्रमाण देशभरात झपाट्याने वाढत आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यभर मुख स्वास्थ तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. दरम्यान, अमरावती विभागात आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीतून 270 रुग्ण हे मुखकर्क रोगाचे आढळून आल्याचे आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यांच्यावर अकोला, यवतमाळ याठिकाणी उपचारासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ.रिजाय फारून यांनी स्पष्ट केले आहे. 

मौखिक कर्करोग पूर्वस्थितीत लक्षात आला तर त्यावर त्वरीत उपचार व समुपदेशन करून त्या व्यक्तीचे जीवन वाचविता येवू शकते. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने 30 वर्षावरील नागरिकांची मुख स्वास्थ तपासणी मोहीम राबविण्यात आली. मुख स्वास्थ हे सर्व शरीराच्या स्वास्थ्याचे गमक आहे. मुख स्वास्थ जर व्यवस्थित ठेवले तर पुष्कळ आजारांपासून आपण वाचू शकतो. मुख कर्करोग हा कर्करोगामध्ये सर्वांत अधिक आढळून येतो. मौखिक कर्करोग जर पुर्वावस्थेत ओळखला तर तो कर्करोगामध्ये परावर्तीत होण्यापासून आपण वाचवू शकतो. 

तंबाखूचे सेवन हेच प्रमुख कारण
तंबाखूचे सेवन करणे हे कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. अशी जनजागृती सुध्दा दरम्यान करण्यात आली होती. यावेळी अमरावती विभागात एकूण 270 रुग्ण हे मुखकर्क रोगाचे आढळून आले होते. त्यांच्यावर अकोला व यवतमाळ याठिकाणी उपचारासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहे.

पुरुषांमध्ये प्रमाण अधिक
कर्करोगाच्या प्रमाणामध्ये मागील काही वर्षांमध्ये वाढ झाली आहे असे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगितले जात असून, ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्च’ने (आयसीएमआर) केलेल्या अभ्यासातून त्याला पुष्टी मिळाली आहे. पुरुषांमध्ये ओठ आणि मौखिक पोकळीचा (तोंडातील पोकळी) कर्करोग जास्त प्रमाणावर आढळून येत असल्याचे निदर्शनास येत आहे. 

अशी घ्या काळजी
-तंबाखुजन्य पदार्थांपासून दूर राहा
-मद्यपानासह इतर व्यसनेही टा‌ळा
-सॉफ्ट ड्रिंक्स, शर्करायुक्त पेये टाळा
-दिवसांतून दोनवेळा ब्रश करा
-नियमित दंत तपासणी गरजेची

औषधोपचारासह शस्त्रक्रीयेसाठी प्रयत्न
विभागात मोहिमेदरम्यान 270 रुग्ण आढळून आले आहेत. आता रुग्णांना योग्य उपचार देण्यासाठी आरोग्य विभागाकडून पुढाकार घेतला जात आहे. त्यांना विहितवेळेत औषधोपचारासह शस्त्रक्रीया करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
-डॉ.रियाज फारूकी, आरोग्य उपसंचालक, अकोला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 270 people have mouth cancer