शेतीत ‘करिअर’ करताहेत ‘थ्री इडियट्स’

विनोद इंगोले
मंगळवार, 1 जानेवारी 2019

नागपूर : राजकुमार हिराणींच्या ‘थ्री इडियट्‌स’ या चित्रपटातील कथेला साजेसे वास्तववादी कथानक येथे आकार घेत आहे. मोठ्या शहरातींल गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्यांना तिलांजली देत रासायनिक अंशमुक्त शेती, पर्यावरण, माती सुपीकता, संवर्धन, गोरक्षण ही ध्येये उराशी बाळगून विदर्भातील तीन तरुणांनी एकत्र येत शेतीत ‘करिअर’ सुरू केले आहे.

नागपूर : राजकुमार हिराणींच्या ‘थ्री इडियट्‌स’ या चित्रपटातील कथेला साजेसे वास्तववादी कथानक येथे आकार घेत आहे. मोठ्या शहरातींल गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्यांना तिलांजली देत रासायनिक अंशमुक्त शेती, पर्यावरण, माती सुपीकता, संवर्धन, गोरक्षण ही ध्येये उराशी बाळगून विदर्भातील तीन तरुणांनी एकत्र येत शेतीत ‘करिअर’ सुरू केले आहे.

शेती परवडत नाही असे म्हणणाऱ्यांना या तिघा मित्रांनी किफायतशीर शेतीची प्रेरणाच आपल्या कृतीतून दिली आहे. शेतीत युवा आणि सुशिक्षित युवकांनी पुढे यावे, हा विचारही त्यातून पुढे आला आहे. नवी पिढी शेतीत काम करण्यापेक्षा नोकरी, व्यवसायाच्या मागे धावत असल्याचे अनेक वेळा बोलले जाते. अर्थात बदलते हवामान, बाजारभाव, मजुरी, पाणीटंचाई आदी विविध कारणांमुळे शेती तोट्याचीही झाली आहे. मात्र विदर्भातील तीन उच्चशिक्षित तरुणांनी शेतीचा या पूर्वीचा अनुभव नसतानाही त्यात आश्‍वासक वाटचाल सुरू केली आहे.

या तिघांपैकी नागपूरच्या नंदनवन भागात राहणारे राजू मदनकर दिल्ली येथे अमेरिकन बॅंकेत नोकरीस होते. अडीच वर्षे नोकरी केल्यानंतर जूनमध्ये राजीनामा देत त्यांनी गाव गाठले. त्यांचे मित्र गोपाल शर्मा बंगळूर येथे नामवंत कंपनीत नोकरीस होते. ‘इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग’चे पदवीधारक गोपाल सहा वर्षे नोकरी केल्यानंतर राजू यांच्याबरोबर शेतीशी जोडले गेले. आता दिल्ली येथे प्रसिद्ध कंपनीत नोकरी करणारे त्यांचे तिसरे मित्र अनिकेत शेटे हे देखील त्यांच्यासोबत रासायनिक शेतीत उतरत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे त्यांची शेती आहे.

प्रयोगातील ठळक बाबी
- कुसुमबी (ता. उमरेड) येथील 14 एकर शेती भाडेतत्त्वावर मिळाली
- जमीन सुपीक करणे, त्यातील सेंद्रिय कर्ब वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले
- द्विदलवर्गीय पिके, त्याद्वारे नत्र स्थिरीकरण, जैविक आच्छादन, पीक अवशेषांचा वापर यावर भर
- पंचगव्याचा प्रामुख्याने वापर
- दीड एकरावर झेंडूचा प्रयोग, त्यानंतर गहू लागवडीचे नियोजन. उर्वरित क्षेत्रावर मिरची, वांगी, तूर
- अवशेषमुक्त उत्पादनांसाठी स्वतःचीच विक्री व्यवस्था उभारण्यचे उद्दिष्ट
- ग्राहकांचे ‘नेटवर्क’ उभारणार

Web Title: 3 friends make a career in Agriculture