वन वणवा नियंत्रणासाठी ३० कोटींचा निधी

वन वणवा नियंत्रणासाठी ३० कोटींचा निधी

३८८ निरीक्षण मनोरे; अत्याधुनिक यंत्रणेच्या वापरावर भर

नागपूर - काही दिवसांपूर्वी नागपुरात वन विभागाच्या कार्यालयाजवळ असलेल्या सेमिनरी हिल परिसरातील जंगलाला आग लागली. दोन दिवसांपूर्वी अमरावती मार्गावरील कोंढाळी जंगलात वणवा पेटला. कोकणासह पश्‍चिम महाराष्ट्रातदेखील अनेक ठिकाणी आगीचे वणवे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. वैशाख सुरू झाली की, अशा घटना घडायला सुरवात होते. 

दरवर्षी वैशाखातील आगीत हजारो हेक्‍टर जंगलाचा कोळसा होतो. राज्यातील वन वणवा आटोक्‍यात आणण्यासाठी आणि बहुमूल्य वनसंपदेचे रक्षण करण्यासाठी आधुनिक वन वणवा प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडून ३० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. राज्यातील जंगलांना आगी लागू नयेत म्हणून १५ फेब्रुवारीपर्यंत जाळरेषा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. १५ फेब्रुवारी ते १५ जूनपर्यंत लागणारे वनवणवे वनाची अवनीती करण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे सरकार दरवर्षीच वन वणव्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नियोजन करीत असते. यंदा १ लाख २७ हजार किलोमीटर परिसरात जाळरेषा तयार केलेल्या आहेत. त्यासाठी १४ कोटी ३९ लाखांचा निधी मिळाला आहे. साहित्य पुरवठा आणि कार्यान्वयन करण्यासाठी एक कोटी २० लाख, राज्यातील १३ वनवृत्तात जनजागृतीसाठी एक कोटी ३० लाख रुपयांचा निधी दिलेला आहे. राज्यातील ३८८ निरीक्षण मनोऱ्यांवर २४ तास वणवा टेहळणी आणि माहिती देण्यासाठी मजूर आणि आग विझविण्यासाठी पथकांची नेमणूक केली आहे. त्यासाठी १० कोटींचा निधी मिळालेला आहे.

आतापर्यंत राज्यातील वनवृत्तात हजारो पोर्टेबल फायर ब्लोअर खरेदी करण्यात आलेले आहेत. आगीपासून संरक्षणासाठी प्रचलित पद्धतीनुसार वन वणवा प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येतात. दहा वर्षांपासून वनक्षेत्रात लागलेल्या आगीच्या घटनांचा आढावा घेऊन अत्याधुनिक पद्धतीने वन वणवा नियंत्रणासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. 

देशभरातील वन क्षेत्रामध्ये लागणाऱ्या आगींवर नियंत्रण मिळविण्यासाठी भारतीय वन सर्वेक्षण विभागाकडून उपग्रहाच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे. त्यामुळे आग लागताच क्षणी संदेश पोहोचविण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेची उभारणी केली आहे. १५ फेब्रुवारी ते १५ जून या उन्हाळ्याच्या काळातील वणव्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्याचा व्यापक उपयोग केला जात असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे वनक्षेत्राला आग लागताच अवघ्या काही मिनिटांतच त्या परिसरातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आग लागलेल्या ठिकाणचा संदेश भ्रमणध्वनीवर पाठविण्याची व्यवस्था केलेली आहे. या प्रणालीमुळे घटनास्थळी पोचणे वन विभागाला सोपे झाले आहे.
 

वन क्षेत्रामध्ये लागणाऱ्या आगींमुळे मोठ्या प्रमाणात जैवविविधता नष्ट होण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. आगींवर नियंत्रणासाठी वन विभागाकडून व्यापक प्रयत्न केले जात आहेत. भारतीय वन सर्वेक्षणच्या उपग्रहामुळे अवघ्या दोन तासांत वणव्याची माहिती मिळू लागली आहे. त्यामुळे आग लागताच संदेश मिळतो आणि आगीवर तातडीने नियंत्रण आणले जात आहे. 

- वाय. एस. यादव, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com