उमेद प्रकल्पातील 30 विद्यार्थ्यांवर शाळाबाह्य होण्याची वेळ

file photo
file photo

वर्धा : रोठा गावात स्थित उमेद प्रकल्पातील 30 विद्यार्थ्यांना गावातील जिल्हा परिषद शाळेने शाळा सोडण्याचे दाखले दिल्यानंतर खासगी शाळेने त्यांना प्रवेश नाकारला. यामुळे विद्यार्थ्यांवर शाळाबाह्य होण्याची वेळ आली. या प्रकरणाविषयी माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे व शिक्षणाधिकारी वाल्मीक इंगोले यांनी गुरुवारी (ता. चार) रोठा येथील जिल्हा परिषद शाळेत भेट दिली व ग्रामस्थांशी चर्चा केली. मात्र, यावेळी तक्रारकर्त्या उमेदच्या संचालिका मंगेशी मून उपस्थित नव्हत्या, असे सांगितले.
दरम्यान, शासकीय अधिकाऱ्यांचे पथक नियोजित 11 वाजता न येता दुपारी एक वाजता आले. त्यासंदर्भात काहीच कळविले नाही व स्वतः संपर्क साधला असता तुमच्याविषयीच तक्रारी असल्याचे सीईओ म्हणाले. या एकूणच प्रकाराविरुद्ध शुक्रवारी (ता. पाच) धरणे देणार असल्याचे मंगेशी मून यांनी कळविले आहे.
विद्यार्थ्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारलेल्या उमेद प्रकल्पाच्या संचालिका मंगेशी मून यांचा पारधी समाजातील मुलांच्या शाळा प्रवेशासाठी लढा सुरू आहे. आश्‍वासन देणाऱ्या खासगी शाळेने प्रवेश नाकारल्याने त्यांनी या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी (ता. चार) इयत्ता पाचवी ते सातवीच्या 10 विद्यार्थ्यांना वर्धा येथील कन्या शाळेत प्रवेश देण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. तर उर्वरित मुलांचा शाळा प्रवेश व्हायचा आहे. एप्रिल महिन्यात सरस्वती शाळेच्या मुख्याध्यापिका धनवीज या उमेद प्रकल्पाला भेट देण्यास आल्या होत्या. त्यांनी आपल्या शाळेत मुलांना घेण्याचे कबूल केले होते. त्यामुळे कटू अनुभव आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून दाखले काढले; पण ऐनवेळी या शाळेने प्रवेशासाठी नकार दिला. यामुळे आता विद्यार्थ्यांची अडचण झाल्याचे मंगेशी मून यांनी यापूर्वी सांगितले होते.

सध्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या दहा विद्यार्थ्यांचे प्रवेश वर्धा येथील कन्या शाळेत देण्यात आले आहेत. तर उर्वरित इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गाचे प्रवेश होणे बाकी आहे. आम्ही जिल्हा परिषदेच्या कोणत्याही शाळेत प्रवेश द्यायला तयार आहोत.
- वाल्मीक इंगोले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com