बंदीभागातील 31 शाळा ओस!

जेवली : विद्यार्थ्यांअभावी ओस पडलेली केंद्रीय शाळा.
जेवली : विद्यार्थ्यांअभावी ओस पडलेली केंद्रीय शाळा.

उमरखेड (जि. यवतमाळ) : आधी शिक्षकांची रिक्तपदे भरा नंतरच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू, असा पवित्रा पालकांनी घेतला. त्यामुळे बंदीभागातील शाळा सुरू होऊनही विद्यार्थी शाळेकडे फिरकले नाही. शिक्षक शाळेत दिवसभर हजर राहून निघून जात असल्याने जिल्हा परिषदेच्या 31 शाळा ओस पडल्याचे चित्र आहे.
तालुक्‍यातील पैनगंगा अभयारण्यात (बंदीभाग) येणाऱ्या प्रत्येक गावात जिल्हा परिषद शाळा आहे. या शाळांमधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, रिक्तपदांमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळताना दिसत नाही. यावर्षी शाळांतील मंजूर शिक्षकांची पदे भरा नंतरच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू, असा इशारा पैनगंगा अभयारण्य संघर्ष समितीच्या माध्यमातून पालकांनी प्रशासनाला दिला होता. याची दखल घेत जिल्हा परिषद सभापती कालिंदा पवार यांनी सोमवारी (ता. 24) संघर्ष समितीसोबत चर्चा करून शिक्षक हे सामायिकीकरणातून अथवा कंत्राटी पद्धतीने बंदीभागात देऊ, असे आश्‍वासन दिले. तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याचे आवाहन केले. मात्र, पालक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. 26 जूनपासून शाळांना सुरुवात झाली. शिक्षक दररोज शाळेत येत आहेत. 11 ते पाच या वेळापर्यंत शाळेत उपस्थित राहून निघून जात आहेत. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप होत आहे. शनिवारी भवानी, चिखली, मोरचंडी, एकांबा, जेवली, मुरली, सोनदाभी, परोटी, गाडी, बोरी, थेरडी आदी गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळेत शुकशुकाट बघावयास मिळाला.

जिल्हा परिषद प्रशासन बंदीभागातील शिक्षकांचा अनुशेष भरून काढण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करीत आहे. मात्र, या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने पालकांनी सध्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे. बंदीभागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षक प्रशासनाकडून देण्यात येतील.
- सचिन खुडे, गटशिक्षणाधिकारी, पं. स. उमरखेड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com