शेतकरी कुटुंबाच्या पहिल्या आत्महत्येच्या घटनेला 33 वर्षे 

शेतकरी कुटुंबाच्या पहिल्या आत्महत्येच्या घटनेला 33 वर्षे 

नागपूर - यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्‍यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव पाटील करपे यांनी त्यांची पत्नी व चार मुलांसह दत्तपूर (वर्धा) येथील मनोहर कुष्ठधामात 19 मार्च 1986 रोजी आत्महत्या केली. शेतकरी कुटुंबाच्या आत्महत्येची महाराष्ट्रातील ही पहिली घटना होती. या घटनेच्या 33 व्या वर्षी सहवेदना व्यक्त करण्यासाठी "जनमंच'च्या वतीने मंगळवारी (ता. 19) सहवेदना कार्यक्रम आयोजित केला आहे. 

नागपूर येथील महाराजबाग चौकातील डॉक्‍टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याजवळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत धरणे आणि विचारमंथन करण्यात येणार आहे. साहेबराव 40 एकर शेतीचे मालक होते. चिलगव्हाणचे 11 वर्षे सरपंच राहिले. तरीही त्यांनी आत्महत्या का केली, या प्रश्‍नांमुळे संवेदनशील मने अस्वस्थ झाली. तेव्हापासून सुरू झालेले आत्महत्यांचे सत्र आजही अव्याहत सुरू आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या आत्महत्येपासून बोध घेत सरकार शेतकऱ्यांसाठी काहीतरी करेल, अशी आशा साहेबराव करपे यांना होती. मृत्यूपूर्व चिठ्ठीत त्यांनी उल्लेखही केला होता. 

साहेबराव संगीत विशारद होते. उत्तम भजन गाणारे म्हणून ते परिचित होते. गावात त्यांचा मोठा वाडा; पण  भग्नावस्थेत. त्या वाड्यातच त्यांचा संसार होता. थकीत बिलापोटी "एमएसईबी'ने वीजजोडणी खंडित केली. 40 पैकी 15 एकरांतील  पोटऱ्यांपर्यंत आलेला गहू-चणा वाळला अन्‌ सोबतच साहेबरावांची स्वप्नेही करपलीत. कर्ज फेडण्याच्या चिंतेने ते सैरभैर झाले. मनाने  खचले. दोन्ही पती-पत्नीने काहीतरी मनाशी ठरवले व मुलांना सोबत घेऊन घराबाहेर पडले. करपे पाटील मनोहर कुष्ठधामात आले. तिथे त्यांनी खोली घेतली. खोलीतच टाळ, हार्मोनियमच्या साथीने भजने गायली. सोबत आणलेल्या स्टोव्हवर पत्नीने भजी केली. त्यात एन्ड्रीन (विषारी औषध) मिसळले. आधी मुलांना भजी खायला दिली. एक-एक करीत चारही मुलांनी व पाठोपाठ पत्नीनेही जगाचा निरोप घेतला. 

आपल्या आत्महत्येमुळे व्यवस्था हादरेल, अशी आशा साहेबरावांना होती. परंतु तसे काही झाले नाही. शेतकरी आत्महत्यांचे सत्र अव्याहत सुरूच आहे. या परिस्थितीवर चिंतन करण्यासाठी ही सभा घेतल्याचे "जनमंच'च्या वतीने कळविण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com