स्कूलबस उलटून 35 विद्यार्थी जखमी; सहा गंभीर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

कोंढा येथील मदर टेरेसा पब्लिक स्कूलच्या बसमधून 35 विद्यार्थी व चार कर्मचारी शाळेतून घरी परतत होते. सेंद्री खुर्द येथील डाव्या कालव्याजवळील वळणावर चालक भय्यालाल काटेखाये यांचे बसवरील नियंत्रण सुटले.

कोंढा/कोसरा (जि. भंडारा) : येथील मदर टेरेसा पब्लिक स्कूलची स्कूलबस उलटून झालेल्या अपघातात 35 विद्यार्थ्यांसह एक शिक्षक व तीन कर्मचारी जखमी झाले. पैकी तीन विद्यार्थी आणि तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (ता. 18) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास कोंढा ते बेलाटी मार्गावरील सेंद्री (खुर्द) जवळील वळणावर झाला. 

चालकाचे सुटले नियंत्रण 

कोंढा येथील मदर टेरेसा पब्लिक स्कूलच्या बसमधून (एमएच 36/ एफ 3041) 35 विद्यार्थी व चार कर्मचारी शाळेतून घरी परतत होते. सेंद्री खुर्द येथील डाव्या कालव्याजवळील वळणावर चालक भय्यालाल काटेखाये यांचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बसने बाभळीच्या झाडाला धडक देऊन दोन कोलांट्या खाल्ल्या. अपघातानंतर चालकाने जखमी विद्यार्थी व महिला मदतनिसांना बसबाहेर काढले. तोपर्यंत कोंढा येथील बाजारात जाणाऱ्या नागरिकांनी त्यांना मदत केली. 

Image may contain: one or more people, people standing, people walking and outdoor
जखमींची विचारपूस करताना नागरिक. 

गंभीर जखमींना भंडाऱ्याला हलविले 

रुग्णवाहिकेद्वारे जखमी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना कोंढा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉ. अतुल बोरकर व त्यांच्या चमूने जखमींवर प्रथमोपचार केला. यातील गंभीर जखमी असलेले विद्यार्थी आर्यन हुमणे (वय 13, मासळ), मयूर उपरीकर (वय 9, रा. सेंद्री), मानसी चिचमलकर (वय 4, रा. सेंद्री), कर्मचारी सुषमा नंदागवळी, प्रतिभा गोसेकर व संध्या गिरडकर यांना भंडारा येथे उपचारासाठी हलविण्यात आले. तसेच किरकोळ जखमी असलेल्या 32 विद्यार्थी व शिक्षक रमेश जांगळे यांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. जखमी विद्यार्थ्यांमध्ये सेंद्री, अत्री, मासळ, ब्राम्ही, बाचेवाडी, सरांडी, विरली, धामणी, मोहरी या गावांतील नर्सरी ते वर्ग आठच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

Image may contain: 2 people, people standing, child and outdoor
जखमी विद्यार्थिनीला पाणी पाजताना गावकरी.

अवश्‍य वाचा- महापौर जोशींवरील गोळीबाराची चौकशी क्राईम ब्रॅंच करणार 

गावकऱ्यांचा संताप 

स्कूलबस उलटून अपघात झाला तेव्हा बाजारात जात असलेल्या गावकऱ्यांनी मुलांना बाहेर काढण्यास मदत केली. तेव्हा बसचालकही सोबत होता. परंतु, बसमधील चिमुकल्या मुलामुलींचा आक्रोश पाहून गावकऱ्यांचा रोष वाढला. त्यामुळे चालक घटनास्थळाहून पसार झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 35 students injured in schoolbus reversal; Six serious