सीएससी केंद्र चालकाकडून 357 शेतकऱ्यांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

-पीक विमा रकमेचा कंपनीकडे भरणा केलाच नाही
-शेतकऱ्यांना दिल्या नकली पावत्या
-नुकसानीचा लाभ न मिळाल्याने प्रकार झाला उघड
-शेतकरी संघटनेची पोलिस स्‍टेशनला तक्रार

संग्रामपूर : खरीप हंगाम 2018 मध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेत सीएससी केंद्र चालकाने शेतकऱ्यांकडून घेतलेली विम्याची रक्कम कंपनीकडे भरणा केली नाही. विशेष म्हणजे विमा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना विमा रक्कम भरल्याची नकली पावती देऊन रक्कम पुढे पाठवलीच नसल्‍याचा धक्‍कादायक प्रकार उघड झाला आहे. सीएससी केंद्र चालक धीरज चांडक व केतन चांडक यांच्‍यावर फसवणुकीचे गुन्‍हे दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्‍हाध्यक्ष रमेश बाणाईत यांनी तामगाव पोलिसांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत प्राप्‍त माहितीनुसार, संग्रामपूर तालुक्‍यातील पातुर्डा येथील धीरज चांडक व केतन चांडक यांनी 13 जुलै 2018 च्‍या दरम्‍यान परिसरातील शेतकऱ्यांचा पीक विमा उतरवला होता. परंतु पीक विमा उतरवत असताना सदर रक्‍कम ही विमा कंपनीला भरणा करणे आवश्‍यक असते. परंतु दोन्‍ही भावांनी बहुतांश शेतकऱ्यांची रक्‍कम पीक विमा कंपनीकडे भरणा केलेली नसल्याची अशी चर्चा आहे. 

मागील वर्षी पडलेल्‍या कोरड्या दुष्काळामुळे संग्रामपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून परतावा देण्यात आला असताना धीरज व केतन चांडक यांच्‍याकडे ज्‍या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवलेला आहे, अशा बहुतांश शेतकऱ्यांना पीक विम्‍याचा परतावा मिळालेला नाही. यावेळी शेतकऱ्यांनी त्‍यांच्‍याकडे चौकशी केली असता त्‍यांनी समर्पक उत्‍तरे त्‍यांनी दिले नाही. चौकशी अंती त्‍यांनी पिकविमा कंपनीकडे विम्‍याचा हप्‍ता भरलेला नसल्‍यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्‍याचा लाभ मिळणार नसल्‍याचे समजले. 

त्‍यामुळे 14 नोव्हेंबर रोजी शेतकरी संघटनेचे वतीने सदर सीएससी केंद्र चालकाविरोधात तामगाव पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. जिल्ह्यात 2018 मधील पीक विमा भरणा केलेले शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचितची संख्या भरपूर आहे. एका गावाचा 357 हा आकडा प्राथमिक असावा, या व्यतिरिक्त असे बरेच प्रकार घडले असल्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. या प्रकरणाची चौकशी झाल्यास मोठा आकडा समोर येण्याची शक्‍यता आहे. 

या भागातील शेतकरी अगोदरच आर्थिक दृष्ट्या हतबल आणि खचलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने वेळीच लक्ष घालत सदर सीएससी संचालकांविरुद्ध कायदेशिर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रमेश बाणाईत यांनी केली आहे.

2018 खरीप हंगामासाठी पीक विमा नगदी भरणा करूनही नुकसान भरपाई मिळाली नाही. अशी तक्रार घेऊन पातुर्डा परिसरातील काही शेतकरी तालुका कृषी कार्यालयात आले होते. त्यामध्ये असलेल्या पावतीवरील स्टेटसमध्ये पेंडीग असे लिहलेले पाहून ती रक्कम विमा कंपनीकडे जमा झालेली नसल्याचे लक्षात आले. म्हणून त्या शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या खामगाव विभागीय कार्यालयात पाठविले होते. त्या ठिकाणी कंपनीच्या प्रतिनिधीने ही शेतकऱ्यांना तुम्‍ही भरलेली रक्कम कंपनीकडे जमा झाली नसल्याचे सांगीतले. यावरून त्या शेतकऱ्यांना विम्याची नुकसान भरपाई मिळाली नसावी.
-रविंद्र गवई, तालुका कृषी अधिकारी, संग्रामपूर

पातुर्डा येथील केंद्र चालकाने शेतकऱ्यांना पीक विमा भरणा झाल्याची पावती बनावट तर दिली नाही ना ? याची चौकशी ही होणे गरजेचे आहे. कारण ज्यांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळाली त्या पावतीमध्ये आणि वंचित असलेल्या या शेतकऱ्यांजवळील पावतीमध्ये बरीच तफावत दिसत आहे. सदर साईटवर छेडछाड करून अशा बनावट पावत्या तर या केंद्र चालकाने बनवल्या नाहीत ना ? हेही सायबर गुन्ह्याच्या दृष्टीने तपासणे गरजेचे बनत आहे.
-रमेश बाणाईत, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना

मी साडे सहा एकर क्षेत्राचा 2018 च्या खरीप हंगामात पातुर्डा येथील सीएससी केंद्रावर नगदी स्वरुपात पीक विमा भरणा केला. केंद्र चालकाने पावती दिल्याने भरणा झाला असे वाटले. परंतु भरपाईमध्ये माझे सोबत बरेच शेतकऱ्यांची नावे आली नाहीत. म्हणून केंद्र चालकाला विचारणा करण्यासाठी गेलो असता त्या केंद्र चालकाने वर्ष झाले आता जाग आली का असे अरेरावीची भाषा वापरली. म्हणून यात संशय आल्याने आम्ही कृषी अधिकारी, विमा कंपनी प्रतिनिधी यांच्याकडे चौकशी केली. त्यात केंद्र चालकाला पैसे देऊनही कंपनीकडे पैसे जमा झाले नसल्याचे उघड झाले. सोबतच गेल्या वर्षात पीक झाले नाही सर्व मदार पीक विमा योजनेच्या लाभावर होती. पोलिसांत याबाबत तक्रार केली आहे.
-निलेश इंगळे, शेतकरी, टाकळी पंच, ता. संग्रामपूर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 357 farmers cheated by CSC center