कन्हान गोळीबारातील चार आरोपींना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

कन्हान - शहरात अवैध धंद्यांच्या वर्चस्वातून गॅंगवॉर भडकून दोन गट एकमेकांच्या समोर आल्याने काठ्या, चाकू, गुप्ती, तलवारींसह देशी कट्ट्याने गोळीबार करण्यात आला. यात तीन जण गंभीर जखमी झाले. घटनेतील चार आरोपींना अटक करण्यात आली.

कन्हान - शहरात अवैध धंद्यांच्या वर्चस्वातून गॅंगवॉर भडकून दोन गट एकमेकांच्या समोर आल्याने काठ्या, चाकू, गुप्ती, तलवारींसह देशी कट्ट्याने गोळीबार करण्यात आला. यात तीन जण गंभीर जखमी झाले. घटनेतील चार आरोपींना अटक करण्यात आली.

मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास पिपरी रोडवरील अशोकनगर चर्चजवळ दोन गट समोरासमोर आल्याने एका गटाने गोळीबार केला. यात अमर ऊर्फ गब्बर भारत सोनटक्‍के (वय २८, पिपरी), रोहन श्‍याम खरे (वय २४, पाटील ले-आउट), शुभम राजन खोब्रागडे (वय २२, पिपरी) यांना गंभीर दुखापत झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर दोघांना नागपूर रुग्णालयात हलविण्यात आले. शुभम खोब्रागडे हा कामावरून घरी परत येत असताना एका टोळीतील आरोपीने त्याचा पाठलाग केला व हाताच्या उजव्या बाजूला चाकू मारला होता. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. अशोकनगरला लागून कोळसा खदानीच्या टेकडीवरील जंगलात दडून बसलेल्या आरोपींना सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले. 

मुख्य आरोपी गौरव राजेश माहतो (वय १९) याच्याकडून जिवंत काडतूस व गावठी कट्टा जप्त करण्यात आला. ललित परिहार, मंगेश टेकाम, ऋषभ हावरे (वय १९, पिपरी) यांच्याकडून एक गुप्ती, दोन चाकू ताब्यात घेण्यात आले. 
शहरात अवैध धंदेवाल्यांचा दबदबा असून गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या वादविवादावर वेळीच दखल घेण्यात न आल्याने ही गोळीबाराची घटना घडल्याची नागरिकांत चर्चा आहे.

Web Title: 4 accused arrested in kanhan firing case