उष्माघाताचे चार बळी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मे 2019

उष्माघाताने विदर्भात चौघांचा मृत्यू झाल्याचे आज उजेडात आले. उष्णाघातामुळे अमरावती जिल्ह्यातील तिघांचा, तर भंडारा जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला. आतापर्यंत अमरावती जिल्ह्यात उष्माघातामुळे एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

अमरावतीत तिघांचा, तर भंडाऱ्यात एकाचा मृत्यू
नागपूर - उष्माघाताने विदर्भात चौघांचा मृत्यू झाल्याचे आज उजेडात आले. उष्णाघातामुळे अमरावती जिल्ह्यातील तिघांचा, तर भंडारा जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला. आतापर्यंत अमरावती जिल्ह्यात उष्माघातामुळे एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे. 

तापमानाचा पारा वर गेला असून, रविवारी (ता. २६) सकाळी अमरावतीच्या जवाहरगेट परिसरात एका बेवारस वृद्धाचा (वय ६५) मृतदेह आढळला. पोटात अन्नाचा कण नाही आणि निवाऱ्याचीही व्यवस्था नसल्यामुळे उष्माघाताने या वृद्धाचा मृत्यू झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. खोलापुरीगेट पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात पाठविला. रविवारी सायंकाळपर्यंत मृत व्यक्तीची ओळख पटली नव्हती. संबंधित व्यक्ती काही दिवसांपासून या परिसरात भीक्षा मागत होती, असे परिसरातील नागरिकांनी पोलिसांना सांगितले.

धामणगाव रेल्वे तालुक्‍यातील निंबोली येथील यशोदा रामभाऊ कामडी (वय ६८) या शनिवारी (ता. २५) अंगणात झाडझूड करताना भोवळ येऊन खाली पडल्या. त्यांचा राहत्या घरीच मृत्यू झाला. धामणगाव येथील दुसऱ्या घटनेत सायकलने दहा किलोमीटर प्रवास करीत असताना रस्त्यात पाणी न मिळाल्यामुळे रमेश पांडुरंग बुंदिले (वय ५२, रा. निंभोरा बोडखा) यांचा मृत्यू झाला. रमेश हे सायकलने पुलगाव येथे कामानिमित्त गेले होते. दुपारी गावाकडे परत येत असताना झाडगाव येथे त्यांना तहान लागली. मात्र, पाणी मिळाले नाही. ते विसावा घेण्यासाठी एका शेतात झाडाखाली बसले असता जागीच त्यांचा मृत्यू झाला. यापूर्वी एका व्यक्तीचा धामणगाव येथील रेल्वे पुलाजवळ उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. उष्माघाताने बळी जाण्याची धामणगाव तालुक्‍यातील ही तिसरी घटना आहे.

उष्माघाताने हमालाचा मृत्यू 
पेट्रोल पंप (ठाणा) येथील टी पॉइंटजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखालील चौकात शनिवारी (ता. २५) सायंकाळी अचानक प्रकृती बिघडल्याने काम करणाऱ्या हमालाचा मृत्यू झाला. भगवान अर्जुन गावंडे (वय ४०) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. ही व्यक्ती रोजंदारीवर हमालीचे काम करीत होती.

Web Title: 4 People Death by Sunstroke Summer Temperature