लाखनीत मिळाला 40 किलो गांजा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

लाखनी (जि. भंडारा) : येथील पोलिसांनी मंगळवारी दुचाकीवरून वाहतूक करण्यात येणारा 40 किलो गांजासह चौघांना अटक केली. महामार्गाने नागपूरकडे जात असलेल्या दोन दुचाकींतून हा गांजा मिळून आला आहे.

लाखनी (जि. भंडारा) : येथील पोलिसांनी मंगळवारी दुचाकीवरून वाहतूक करण्यात येणारा 40 किलो गांजासह चौघांना अटक केली. महामार्गाने नागपूरकडे जात असलेल्या दोन दुचाकींतून हा गांजा मिळून आला आहे.
राष्ट्रीय महामार्गावर पोलिस ठाण्यासमोर मंगळवारी सकाळी पोलिसांनी नाकेबंदी करून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली. छत्तीसगड राज्यातून नागपूरकडे जात असलेल्या दोन विना नंबरच्या दुचाकींना अडवून पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील निराळे आणि पोलिस नायक धनराज भालेराव यांनी विचारपूस केली. त्यावरील चार जणांनी वेगवेगळे कारण सांगितल्याने पोलिसांना संशय आला. त्यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या पोत्यांतील मालाची तपासणी केली असता दोन पोत्यात अंदाजे 40 किलो गांजा मिळून आला. यातील आरोपी पवन उपाध्याय (वय 24), बालाराम हुंबरे (वय 27), सोनू दुबे (वय 28) आणि किशोर उईके (वय 19, रा. सानेगाव) यांना पोलिसांनी अटक केली. ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गांजा मिळण्याची पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. लाखनी पोलिसांनी अंमलीपदार्थ विरोधी कायद्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 40 kg of ganja was obtained in Lakhani