व्यापाऱ्याचे 40 लाख घेऊन पोलिस रफुचक्कर!

व्यापाऱ्याचे 40 लाख  घेऊन पोलिस रफुचक्कर!

नागपूर : मुंबईच्या व्यापाऱ्याकडील 40 लाखांची रोख घेऊन दोन पोलिस कर्मचारी रफुचक्कर झाले. प्रकरणाचा तपास करणारे मुंबई गुन्हेशाखेचे पथक एक एक धागा जोडत नागपुरात धडकले. त्यांनी लोहमार्ग पोलिस दलातील दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन सोबत नेले असून त्यांना तडकाफडकी निलंबितही करण्यात आले आहे. या कारवाईने लोहमार्ग पोलिस दलात एकच खळबळ उडवून दिली आहे. 
लोहमार्ग दलाकडून या प्रकरणाबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात येत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एक सहायक पोलिस उपनिरीक्षक तर दुसरा पोलिस शिपाई आहे. ही संपूर्ण रक्कम मुंबईतील व्यापाऱ्याची आहे. व्यापाऱ्याकडील नोकर पोलिस कर्मचाऱ्यांपैकी एकाचा मित्र आहे. त्यानेच व्यापाऱ्यासंदर्भात माहिती दिली. तो हवालाच्या व्यवसायात असून लाखो रुपये नेहमीच वेगवेगळ्या राज्यात घेऊन जात असल्याचेही त्याने सांगितले. या आधारे दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी संगनमत करीत लुटीची योजना आखली. मुंबईत जाऊन व्यापाऱ्याबाबत अधिक माहिती घेतली. एक दिवस व्यापारी पैसे घेऊन निघताच पोलिस कर्मचाऱ्यांनी पाठलाग केला. एका ठिकाणी थांबवून चौकशी केली. बॅगमध्ये 40 लाख रुपये आढळून आले. भांडाफोड झाल्याचे समजून व्यापाऱ्याने प्रकरण तिथेच दाबण्यासाठी एक लाख रुपये देऊ केले. पण, ते तयार झाले नाही. व्यापाऱ्याला वाहनात बसवून काही अंतरावर पोहचल्यानंतर त्याला खाली उतरवून देत कर्मचारी 40 लाख घेऊन गेले. 
कोणतीही कारवाई न करता पोलिस रक्कम घेऊन गेल्याने व्यापाऱ्याचे माथे ठणकले. त्याने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. चौकशीसाठी थांबविलेल्या व्यक्तींनी त्यांचे ओळखपत्र दाखविले होते. त्यावर नागपूर लोहमार्ग असा उल्लेख होता. याबाबत व्यापाऱ्याने तपास पथकाला माहिती दिली. यानंतर पथकाने लोहमार्ग ठाणे गाठून माहिती घेतली. लुटीचा आरोप असलेल्या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांचा शोध घेत नागभिड येथून त्यांच्या मुसक्‍या आवळल्या आणि सोबत घेऊन गेले. घटनेची गंभीर दखल घेत दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. अधिकाऱ्यांनी या घटनाक्रमाला दुजोरा दिला. परंतु, संबंधित कर्मचाऱ्यांची नावे सांगण्यास नकार दिला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com