42 फवारणी बाधित रुग्णालयात दाखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

यवतमाळ : शेतातील पिकांवर कीटकनाशक औषधांच्या फवारणीमुळे शेतकरी व शेतमजूर बाधित होण्याचे प्रमाण जिल्ह्यात चांगलेच वाढलेले आहे. गेल्या सव्वा महिन्यात एकूण 127 शेतकरी व शेतमजुरांना आतापर्यंत बाधा झालेली आहे. त्यापैकी 42 रुग्णांवर येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

यवतमाळ : शेतातील पिकांवर कीटकनाशक औषधांच्या फवारणीमुळे शेतकरी व शेतमजूर बाधित होण्याचे प्रमाण जिल्ह्यात चांगलेच वाढलेले आहे. गेल्या सव्वा महिन्यात एकूण 127 शेतकरी व शेतमजुरांना आतापर्यंत बाधा झालेली आहे. त्यापैकी 42 रुग्णांवर येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
कपाशी व सोयाबीन पिकांची वाढ होत असतानाच कीडीचे आक्रमणदेखील दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे. अधूनमधून कोसळणाऱ्या पावसामुळे पिकांमध्ये तणही वाढलेले आहे. तत्काळ फवारणी करून पीक वाचविण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. त्यासाठी जहाल कीटकनाशक औषधांची फवारणी पिकांवर करण्यात येत आहे. ही कीटकनाशकांची फवारणी आता शेतकरी व शेतमजुरांसाठी धोकादायक ठरत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दोन वर्षांपूर्वी फवारणीमुळे 22 शेतकरी व शेतमजुरांचे बळी गेलेले आहेत. त्यानंतर करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे गेल्या वर्षी मृत्यू रोखण्यात यश आले. मात्र, दीडशे शेतकरी, शेतमजूर विषबाधित झालेले होते. यंदा फवारणीमुळे विषबाधा होण्याचे प्रमाण जास्त आहे. गेल्या 13 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर या कालावधीत एकूण 127 जणांना बाधा झालेली आहे. नव्याने 17 बाधितांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेले. सध्या 42 रुग्णांवर अतिदक्षता विभागासह वॉर्डात उपचार सुरू आहेत. त्यापैकी नऊ जणांची प्रकृती गंभीर आहे. एक रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. उपचाराअंती 73 जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनातर्फे देण्यात आली.
सावधान, धोका वाढतोय
फवारणीतून विषबाधा होण्याचा धोका यंदा चांगलाच वाढविण्याची चिन्हे दिसून येत आहेत. नेर व आर्णी तालुक्‍यांत दोघांचे बळी गेलेले असले तरी ऑन रेकॉर्ड त्याची दखल घेण्यात आलेली नाही. जिल्ह्यात दररोज कीटकनाशक औषधांच्या फवारणीतून विषबाधा होण्याच्या घटना उघडकीस येत आहेत. उपाययोजनेसाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ गंभीर पाऊल उचलणे आवश्‍यक झालेले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 42 sprayed admited at hospital