चंद्रपूर जिल्ह्यात 42 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

- काही ठिकाणी मशीनमध्ये बिघाड
- पावसाच्या हजेरीने मतदानावर परिणाम

चंद्रपूर : जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजतापर्यंत 42 टक्के मतदान झाले. काही ठिकाणी मशीनमध्ये बिघाड आढळून आल्याने मतदारांना ताटकळत राहावे लागले. मशीनमध्ये बिघाड, काही ठिकाणी पाऊस झाला. त्याचा मतदानावर परिणाम झाला. सकाळी सात वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. चंद्रपूर शहरात सकाळच्या सुमारास मतदान केंद्रांवर फारशी गर्दी दिसून आली नाही. दहा वाजतानंतर अनेक केंद्रांवर मोठी गर्दी दिसून आली. चंद्रपूर शहरातील जनता महाविद्यालयातील मतदान केंद्रातील मशीनमध्ये बिघाड होता. त्यामुळे काहीवेळ मतदारांना ताटकळत राहावे लागले. गोंडपिपरी तालुक्‍यातील सोमनपल्ली येथे ईव्हीएम यंत्रात बिघाड आला. त्यामुळे दोन तास मतदार ताटकळत होते. अनेकजण मतदान न करताच परतले. राजुरा येथील रामपूर केंद्रावरही असाच घोळ होता. धाबा येथे निवडणुकीदरम्यान दारू पकडण्यात आली. ब्रह्मपुरी तालुक्‍यातील नीलज येथे ईव्हीएममध्ये बिघाड झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 42% voting in Chandrapur district