मेळघाटात वर्षाला 450 तरुणांचा अकाली मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

मेळघाट, कुपोषण व बालमृत्यू हे जणू समीकरणच झाले आहे. हे समीकरण भयावह असून, या पलीकडे विदारक वास्तव पुढे आले आहे. परिसरात अकाली दगावणाऱ्या तरुणांची संख्या साडेचारशेपेक्षा जास्त आहे.

नागपूर - मेळघाट, कुपोषण व बालमृत्यू हे जणू समीकरणच झाले आहे. हे समीकरण भयावह असून, या पलीकडे विदारक वास्तव पुढे आले आहे. परिसरात अकाली दगावणाऱ्या तरुणांची संख्या साडेचारशेपेक्षा जास्त आहे. ही आकडेवारी माता व बालमृत्यूपेक्षा मोठी असल्याचे महात्मा गांधी ट्रायबल हॉस्पिटल (महान)चे संस्थापक डॉ. आशीष सातव यांनी पुढे आणली आहे. 

असोसिएशन ऑफ सर्जन्सच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रामदासपेठेतील हॉटेलमध्ये पार पडला. अध्यक्षपदी डॉ. टी. आर. व्ही. विल्किन्सन यांनी पदग्रहण केले. मेळघाट कुपोषण, बालमृत्यू व मातामृत्यूंमुळे प्रकाशात आले आहे. येथील 75 ते 80 टक्के मुले कुपोषित जन्माला येतात. त्यापैकी 20 टक्के बालके ही अतितीव्र गटात मोडत असून, पाच हजारांवर बालके मृत्यूच्या दाढेत उभी आहेत. नवजात अर्भक मृत्यूदर 50 वरून 25 वर आणणे हे एकप्रकारचे आव्हान आहे. मात्र, यापलीकडे मेळघाटात दरवर्षी एक लाख लोकसंख्येतील 450 तरुण अकाली मृत्यूच्या विळख्यात येतात. यामुळे मेळघाटातील कुटुंबही उद्‌ध्वस्त होत असल्याचे चित्र आहे. या मृत्यूला क्षयरोग कारण असल्याचे पुढे आले आहे. 21 टक्के मृत्यू हे क्षयरोगाने होत आहेत. त्यापाठोपाठ 12 टक्के रक्तदाबाने, 11 टक्के हृदयरोगाने, 12 टक्के कर्करोगाने, पाच टक्के मेंदू मलेरियाने होत असल्याची माहिती डॉ. सातव यांनी दिली. 

मेळघाटात अकाली मृत्यू पावणाऱ्या तरुणांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेतला आहे. महानच्या सहकार्याने आदिवासी विभाग, जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेतील काही तरुण डॉक्‍टरांच्या मदतीने सुरुवातीला काही पाड्यांवर पथदर्शी प्रकल्प हाती घेतला गेला. यापुढे आता शंभर पाड्यांवर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. 
- डॉ. आशीष सातव, महान. 

Web Title: 450 youths premature death in Melghat