धानाला देणार पाचशे रुपये बोनस

साकोली : रिमोटद्वारे विविध योजनांचे भूमिपूजन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मंचावर उपस्थित इतर मान्यवर.
साकोली : रिमोटद्वारे विविध योजनांचे भूमिपूजन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मंचावर उपस्थित इतर मान्यवर.

साकोली (भंडारा) : भंडारा-गोंदिया हे प्रामुख्याने धान उत्पादन करणारे जिल्हे आहेत. शासनाने धानाला दरवर्षी दोनशे रुपये बोनस दिला आहे. बोनस वाढवून देण्याची मागणी मंजूर करून त्यांना पाचशे रुपये बोनस देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. साकोली येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते. एक हजार कोटी रुपये खर्च करून भंडारा-गोंदिया राष्ट्रीय महामार्ग सहापदरी करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात केली.
साकोली येथे आज जिल्ह्यातील 518.64 कोटी रुपये किमतीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आमदार डॉ. परिणय फुके, राजेश काशिवार, चरण वाघमारे, रामचंद्र अवसरे, विजय रहांगडाले, संजय पुराम, म्हाडाचे अध्यक्ष तारिक कुरेशी, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा पोलिस अधीक्षक विनीता साहू, नगराध्यक्ष धनवंता राऊत, सुनील मेंढे, प्रदीप पडोळे उपस्थित होते.
तलावांचे कंत्राट केवळ मासेमारी संस्थांनाच
भंडारा-गोंदिया तलावांचा सुद्धा जिल्हा आहे. तलावांची लीज कमी करण्याची मागणी येथील मासेमारी संस्थेची होती. 500 हेक्‍टर क्षमता असणाऱ्या तलावासाठी आता लीज आकारली जाणार नाही. 500 ते 1000 हेक्‍टरसाठी सहाशे तर 1 हजार हेक्‍टरवरील तलावासाठी 900 रुपये लीज आकारली जाईल. तलावाचे कंत्राट केवळ मासेमारी संस्थानाच देण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करावा : नितीन गडकरी
भंडारा येथे बायो एव्हिएशन फ्युएल हब निर्माण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यामुळे धानाच्या तणसापासून इथेनॉलची निर्मिती होऊन इंधनाला पर्याय मिळेल, शेतकऱ्यांना आर्थिक लाभ तसेच तरुणांच्या हाताला काम मिळेल असे नितीन गडकरी म्हणाले. शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करण्याचा सल्ला त्यांनी दिला. नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्ग सहापदरी करण्यासाठी आपल्या विभागाने मंजुरी दिली असून एक हजार कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येणाऱ्या महामार्गाचे काम तीन महिन्यात सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. जिल्ह्यात 2750 कोटींची कामे मंजूर झाली असून 1630 कोटींची कामे प्रस्तावित आहेत असे ते म्हणाले. भंडारा बायपास 400 कोटी, भंडारा तुमसर रस्ता 250 कोटीला मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com