अबकी बार...कोणाचे सरकार? 

अबकी बार...कोणाचे सरकार? 

नागपूर - महापालिकेच्या निवडणुकीत सरासरी 54 टक्के मतदान झाले असून, मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता तब्बल 1,135 उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले आहे. काही तुरळक घटना, गैरसोयीचे प्रकार वगळता मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. आकाराने प्रचंड मोठा प्रभाग असल्याने शेवटपर्यंत मतदारांचा कौल समजू शकला नसल्याने सर्वच उमेदवार अस्वस्थ झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शहर असल्याने गुरुवारच्या मतमोजणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 

केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याने भाजपला कुठल्याही परिस्थितीत नागपूर महापालिका आपल्या ताब्यात ठेवायची आहे. याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरात मॅरेथॉन प्रचार केला. कार्यकर्त्यांची नाराजी दूर केली. उमेदवार नव्हे तर पक्षाकडे मतदान करण्याचे आवाहन केले. दुसरीकडे कॉंग्रेसचे उमेदवारीपासून तर मतदानापर्यंत आपसात भांडले. स्टार प्रचारकांनी पाठ फिरविली असतानाही अनेकांनी तगडे आव्हान उभे केल्याने भाजपचे उमेदवार धास्तावले आहेत. मतदारांच्या प्रतिसादाने कॉंग्रेस उत्साहात असून त्यांना चमत्काराची अपेक्षा आहे. 

मंगळवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत मतदार राजाने कुणाला कौल दिला, याबाबतची चर्चा लगेच चौकाचौकांतील टपरींवर सुरू झाली असून प्रत्येकालाच आता निकालाची उत्सुकता लागली आहे. 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजतापासून शहरातील 12 केंद्रांवर मतमोजणी होणार आहे. 

आज सकाळी साडेसात वाजता शहरातील 2,783 मतदान केंद्रांवर मतदानास प्रारंभ झाला. शहरातील गर्भश्रीमंत भाग सोडला तर मध्यमवर्गीय रहिवासी क्षेत्रांमधील मतदान केंद्रांवर सकाळी गर्दी दिसून आली. विशेषतः झोपडपट्टी क्षेत्रांमध्ये दुपारपर्यंत चांगलीच गर्दी दिसून आली. नवमतदारांपासून 100 वर्षीय वृद्धांपर्यंत साऱ्यांनीच मतदानाचा हक्क बजावला. मतदारांसाठी मतदान केंद्रापासून दोनशे मीटरनंतर राजकीय पक्षांनी मतदारयादीतून नाव शोधून देण्यासाठी बूथ लावले होते. अनेकजण या बूथवर नावे शोधून मतदान केंद्रापर्यंत पोहोचत होते. काही भागात तीन-चार घरांतील कुटुंबीय एकाचवेळी मतदानास बाहेर आल्याचेही दिसून आले. त्यामुळे काही भागांत मतदान केंद्रावर एकाचवेळी गर्दी झाली होती. काही भागांमध्ये मतदान केंद्रावर गर्दी नसली तरी मतदार येऊन मतदान करीत असल्याचे काही मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. काही भागांत मतदारयादीत नाव नसल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला. परंतु, निवडणूक अधिकारी, पोलिसांनी त्यांची समजूत काढत त्यांचे इतरत्र मतदान केंद्रावर नाव शोधून देण्यास मदत केली. शहरातील अनेक भागांतील मतदान केंद्रावर दुपारी साडेतीन वाजेनंतर गर्दी झाली. प्रभाग 29 सह काही मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदारांना दीड तासांपर्यंत ताटकळत उभे राहावे लागत होते. प्रभाग 29 मध्ये येणाऱ्या नरसाळा-हुडकेश्‍वरचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर येथील नागरिकांनी प्रथमच महापालिकेसाठी मतदान केले. सकाळपासूनच नरसाळा-हुडकेश्‍वर गावातील मतदान केंद्रावर नागरिकांचा उत्साह दिसून आला. पाच वाजेनंतर अनेक मतदान केंद्रावरील गर्दी ओसरली. मात्र, ईव्हीएम बिघाडामुळे काही मतदान केंद्रांवर मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली. येथे साडेपाच वाजेनंतरही मतदानासाठी रांगा होत्या. 

उमेदवारांचा उत्साह 
मतदानापूर्वी मतदान अधिकाऱ्यांनी मतदानाचे प्रात्यक्षिक दाखविले. यासाठी अनेक उमेदवारांनी हजेरी लावली. उत्साहाच्या भरात एकमेकांविरोधात उभे असलेल्या उमेदवारांनी परस्परांना शुभेच्छा दिल्या. अनेक उमेदवार मतदारांसाठी लावण्यासाठी आलेल्या बूथवर कार्यकर्त्यांकडून कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होते. काही उमेदवारांनी त्यांच्या बूथवर मतदारांसाठी पाण्याचीही सोय केली होती. 

साडेपाच वाजताच प्रवेशद्वार बंद 
सायंकाळी साडेपाच वाजता मतदान संपुष्टात येताच मतदान केंद्रावर असलेल्या पोलिसांनी बूथ इमारतीचे प्रवेशद्वार बंद केले. यानंतर मतदान अधिकाऱ्यांनी मतदानाची टक्केवारी काढून झोनल अधिकाऱ्यांकडे पाठविण्याची प्रक्रिया केली. संपूर्ण प्रक्रियेनंतर मतदानाचे साहित्य, ईव्हीएम आदी क्रीडा चौकातील मतदान साहित्य केंद्रावर पोहोचविले. 

निश्‍चित टक्केवारीसाठी महापालिकेचा कासवगती 
साडेपाच वाजता मतदानाची प्रक्रिया संपुष्टात आली. यानंतर तासाभरात मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी पाठविली. सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठविली. अशाप्रकारे रात्री साडेदहापर्यंत मतदानाच्या टक्केवारीचा घोळ सुरू होता. रात्री अकरा वाजता महापालिककेडून निश्‍चित टक्केवारी घोषित करण्यात आली. 

मागील तीन निवडणुकीतील मतदान 
वर्ष एकूण मतदार झालेले मतदान टक्केवारी 
2002 13,04,264 6,39,974 49.06 
2007 14,31,479 8,05,840 56.29 
2012 19,86,057 10,32,760 52 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com